शाहू महाराज छत्रपतींनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; सरकारला पुन्हा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 02:45 PM2023-10-31T14:45:13+5:302023-10-31T14:45:44+5:30

मराठा समाजाने शांततेने आंदोलन करावे. आपले ध्येय, धोरण काय हे लक्षात ठेऊन कामकाज केले पाहिजे असं शाहू महाराज छत्रपती म्हणाले.

Maratha Reservation: Shahu Maharaj Chhatrapati met Manoj Jarange Patal; Warning again to the government | शाहू महाराज छत्रपतींनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; सरकारला पुन्हा इशारा

शाहू महाराज छत्रपतींनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; सरकारला पुन्हा इशारा

जालना – मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी इथं उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची कोल्हापूरच्या शाहू महाराज छत्रपतींनी भेट घेतली. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. बीडमध्ये काल मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. त्यात आमदार, खासदारांनाही मराठा आंदोलकांच्या आक्रोशाला तोंड द्यावे लागले. जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे मराठा समाज एकटवला आहे. मराठा समाजाने जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभं राहिले पाहिजे असं आवाहन शाहू महाराज छत्रपतींनी केले आहे.

शाहू महाराज छत्रपती म्हणाले की, समाजात दुफळी न होता आरक्षणासाठी मराठा बांधवांनी एकत्र आले पाहिजे. जरांगे पाटील यांना सहकार्य केले पाहिजे. जाळपोळ कोण करतंय हे मला माहिती नाही. तरीपण मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे शांततेत आंदोलन केले पाहिजे. जेणेकरून मराठा समाजावर अन्याय आणि ठपका दोन्ही पडता कामा नये. आत्महत्या करून आरक्षण मिळणार नाही. फक्त जीव जातील. हे जीव राहिले तर जोमाने काम करता येईल. युवकांनी आत्महत्या करू नये असंही त्यांनी सांगितले.

तसेच मराठा समाजाने शांततेने आंदोलन करावे. आपले ध्येय, धोरण काय हे लक्षात ठेऊन कामकाज केले पाहिजे. समाजानं केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील. शासनाच्या बैठकीत आरक्षण मान्य करतील अशी अपेक्षा आहे. मनोज जरांगे पाटील यांना सहकार्य राहावे. जिल्हाजिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटलांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. पाणी प्यायले पाहिजे. आपल्यासाठी दिर्घकाळ मनोज जरांगे पाटील काम करतील या सदिच्छा आहेत असंही शाहू महाराज छत्रपती म्हणाले.

दरम्यान, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती इथं आलेत, मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही. गोरगरिबांना न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत. विशेष अधिवेशन बोलावून सरकारने समितीचा अहवाल स्वीकारून मराठा समाजाचा ओबीसीत सामावेश करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे द्यावे. अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही. निजामकालीन दस्तावेज शोधा, महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अर्धवट दिले तर ते सरकारला जड जाईल. आज महाराज स्वत: येऊन आंदोलनाच्या पाठिशी उभे राहिलेत. सरकारने हे गांभीर्याने घ्यावे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

Web Title: Maratha Reservation: Shahu Maharaj Chhatrapati met Manoj Jarange Patal; Warning again to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.