जरांगेंच्या घोषणेआधी दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य; सर्व मागण्या मान्य, आता...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 02:35 PM2024-01-26T14:35:13+5:302024-01-26T14:35:50+5:30

शिवसेना नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

maratha reservation shivsena Deepak Kesarkars Big Statement Before manoj jarange patil Announcement | जरांगेंच्या घोषणेआधी दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य; सर्व मागण्या मान्य, आता...

जरांगेंच्या घोषणेआधी दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य; सर्व मागण्या मान्य, आता...

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत केलेल्या चर्चेनंतर थोड्याच वेळात या चर्चेचा तपशील स्वत: जरांगे पाटील हे समाजासमोर ठेवणार आहेत. तसंच यावेळी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन मागे घेण्याची घोषणाही करू शकतात. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. "मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. शासकीय नियमांनुसार त्यावर अंमलबजावणी होईल. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आपण ३७ लाख कुणबी प्रमाणपत्र दिले. आता आणखी देऊन ही संख्या ५० लाखांच्या वर जाणार आहे," असा दावा दीपक केसरकरांनी केला आहे.

मराठा आंदोलनाबाबत बोलताना दीपक केसरकर पुढे म्हणाले की, "मुंबई ठप्प होणं हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत यंत्रणा कामाला लावली आहे. शेवटी प्रथा परंपरेचा मान ठेवणे ही सुद्धा राज्याची संस्कृती राहिली आहे. किती अधिकारी भेटायला गेले, किती नेते भेटायला गेले आणि आता सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मनोज जरांगेनी मान ठेवला पाहिजे, त्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेटून आनंद नक्कीच साजरा करतील," अशी भूमिका केसरकर यांनी घेतली आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जवळपास तासभर केलेल्या चर्चेनंतर या चर्चेबाबतची माहिती समाजबांधवांना देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे वाशीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचले. यावेळी पाटील यांनी सांगितलं की, सरकारने आपल्याला काही कागदपत्रे दिली आहेत. त्यात कोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत, हे मी वाचून दाखवणार आहे. मात्र आंदोलनाबाबतचा अंतिम निर्णय समाजाला विचारूनच घेणार अशी घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाबाबत नक्की काय घोषणा करतात, हे ऐकण्यासाठी शिवाजी महाराज चौकात लाखोंचा जनसमुदाय लोटला आहे. मात्र साऊंड सिस्टम व्यवस्थितरित्या चालत नसल्याने दुसरी व्यवस्था होईपर्यंत आपण वाट पाहावी, २ वाजता मी तुम्हाला सरकारने घेतलेले निर्णय वाचून दाखवतो आणि मग चर्चा करू, असं आवाहन जरांगे पाटील यांनी आंदोलकांना केलं आहे.

Web Title: maratha reservation shivsena Deepak Kesarkars Big Statement Before manoj jarange patil Announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.