Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरु; भर पावसात मूक आंदाेलनाची सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 07:04 AM2021-06-17T07:04:01+5:302021-06-17T07:06:00+5:30
कोल्हापुरातून अंतिम लढाईची ज्योत प्रज्वलित : राज्य सरकारकडून दखल; चर्चेचे निमंत्रण. आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधीस्थळी बुधवारी झालेल्या मूक आंदोलनात राज्यभरातून आलेले मराठा समाजातील प्रमुख समन्वयक तसेच जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत अंतिम लढाईची ज्योत प्रज्वलित झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोणत्याही वर्गाचे आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला घटना दुरुस्ती करून स्वतंत्र आरक्षण द्यावे, या मागणीसाठी रस्त्यावरील अंतिम लढाईला बुधवारी ऐतिहासिक कोल्हापुरातून जोरदार पावसाच्या साक्षीने सुरुवात झाली. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाचे रणशिंग फुंकताना मराठा समाज आता आरक्षण मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा संदेश या मूक आंदोलनातून देण्यात आला.
आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधीस्थळी बुधवारी झालेल्या मूक आंदोलनात राज्यभरातून आलेले मराठा समाजातील प्रमुख समन्वयक तसेच जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत अंतिम लढाईची ज्योत प्रज्वलित झाली. या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाने घेतली असून, आमच्या अखत्यारीतील ज्या पाच प्रमुख मागण्या आहेत, त्या चर्चेतून सोडविण्याची ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करून चर्चा घडवून आणली जाईल, आपण चर्चेला यावे, अशी आग्रही विनंती दोन्ही मंत्र्यांनी खासदार संभाजीराजे यांना केली.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षण मिळवून देण्याच्या बाबतीत राज्य सरकार ठाम आहे, यापूर्वी झालेल्या चुका टाळून आरक्षण देईपर्यंत जी-जी जबाबदारी राज्य सरकारची असेल ती-ती पार पाडण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे स्पष्ट केले.
‘वाट्टेल ती किंमत देऊ; पण आरक्षण मिळवून देऊ,’ अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जी चूक मागच्या राज्य सरकारकडून झाली, तीच चूक आमच्या सरकारकडूनही झाली. आता राजकारण करीत न बसता या चुका मान्य करून समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या प्रक्रियेत भाजपनेदेखील सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
- पंतप्रधान का बोलत नाहीत?
मराठा आरक्षणाचे आंदोलन गेली अनेक वर्षे सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयापर्यंत युक्तिवाद झाले तरीही आरक्षण मिळाले नाही. मराठा समाज अस्वस्थ असताना आणि तो आरक्षण मागत असताना केंद्र सरकारचे प्रमुख असणारे पंतप्रधान याबाबत का बोलत नाहीत, असा सवाल शाहू छत्रपती यांनी या वेळी उपस्थित केला.