शिवछत्रपतींसमोर शपथ घेऊन सांगतो..., दसरा मेळाव्यात मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 09:26 PM2023-10-24T21:26:57+5:302023-10-24T22:20:37+5:30
Eknath Shinde Dasara Melava Speech: मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय पुन्हा एकदा पेटला आहे. त्यामुळे आज शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय भाष्य़ करतात, याकडे मराठा समाजासह सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा पेटला आहे. त्यामुळे आज शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय भाष्य़ करतात, याकडे मराठा समाजासह सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. दरम्यान, आज उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं विधान केलं आहे.शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत मी मराठा समाजासाठी लढणार. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने त्यांची शपथ घेऊन सांगतो की, सर्वांना न्याय मिळवून देईन, असे विधान एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करून सांगितले.
शिवसैनिकांना संबोधित करताना मराठा आरक्षणाचा विषय निघाल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, मीदेखील सर्वसामान्य मराठा कुटुंबातला आहे, मला त्यांची दु:खं कळतात. वेदना कळतात. एस.टी. शिंदे समिती काम करतेय. सर्वोच्च न्यायालयाने आमची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेतली आहे. त्यामुळे आरक्षाच्या लढाईतील एक दरवाजा खुला झाला आहे. कुणावरही अन्याय न करता, कुणाचंही काढून न घेता हे आरक्षण मराठा समाजाला देणार. या एकनाथ शिंदेंच्या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत मी मराठा समाजासाठी लढणार. इतर कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार. मी छत्रपतींच्या साक्षीने त्यांची शपथ घेऊन सांगतो की, सर्वांना न्याय मिळवून देईन. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलत असलेल्या मराठा तरुणांना भावूक आवाहन केलं. तुम्हाला सांगतो की, टोकाचं पाऊल उचलू नका. आत्महत्या करू नका. आपलं कुटुंब, मुलाबाळांचा विचार करा. हे सरकार तुमचं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हे आरक्षण आम्ही दिलं. ते हायकोर्टात टिकलं. सुप्रिम कोर्टात टिकलं नाही. ते का टिकलं नाही, त्याला कोण जबाबदार आहे. हे सर्वांना माहिती आहे. त्याबाबत योग्य वेळी मी बोलेन सध्या जातीजातीत संघर्ष पेटवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी भीतीही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.