जरांगेंच्या उपोषणावरून अखेर अंतरवाली सराटीत ग्रामसभेचा ठराव; बाजूने अन् विरोधात किती मतं पडली?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 01:48 PM2024-06-08T13:48:54+5:302024-06-08T14:05:48+5:30

पोलिसांनीही जरांगेंच्या उपोषणाला परवानगी नाकारल्याचं बोललं जात आहे. मात्र या मुद्द्यावर आज अंतरवाली सराटीच्या ग्रामपंचायतीत ठराव घेण्यात आला आहे.

maratha reservation the resolution of the Gram Sabha in Antarwali Sarati on the hunger strike of the manoj jarange How many votes were cast in favor and against | जरांगेंच्या उपोषणावरून अखेर अंतरवाली सराटीत ग्रामसभेचा ठराव; बाजूने अन् विरोधात किती मतं पडली?

जरांगेंच्या उपोषणावरून अखेर अंतरवाली सराटीत ग्रामसभेचा ठराव; बाजूने अन् विरोधात किती मतं पडली?

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक संपल्यानंतर पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी रणशिंग फुंकलं आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र गावातीलच काही नागरिकांनी विरोध करत या उपोषणाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनीही जरांगेंच्या उपोषणाला परवानगी नाकारल्याचं बोललं जात आहे. मात्र या मुद्द्यावर आज अंतरवाली सराटीच्या ग्रामपंचायतीत ठराव घेण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी देण्यात यावी का, याबाबत घेण्यात आलेल्या ठरावाच्या बाजूने ५ सदस्यांनी मतदान केले, तर इतर ५ सदस्यांनी विरोधात मतदान केले. अखेर गावच्या सरपंचांनी आपलं निर्णायक मत जरांगे यांच्या उपोषणाच्या बाजूने दिल्याने हा ठराव मंजूर झाला असल्याची माहिती ग्रामसेवकांनी दिली आहे.

ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावानंतर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "मागील दोन दिवसात आम्ही उपोषणाबाबत गावात सह्यांची मोहीम राबवली. यावेळी गावातील सर्वच जाती-धर्माच्या लोकांनी आम्ही उपोषण करावं, यासाठी सहमती दर्शवत सह्या दिल्या आहेत. त्यामध्ये सर्वच जातीतील लोकांचा समावेश आहे. या गावकऱ्यांचे मी आभार मानतो. असं उपोषण करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या परवानगीची गरज नसते. त्यामुळे ठराव घेण्याची गरज नाही, असं माझं म्हणणं होतं. मात्र आता ठरावही मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे मी सर्वांचं अभिनंदन करतो."

"मी मागे हटणार नाही"

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची चर्चा असल्याने याबाबत जरांगे यांनी संताप व्यक्त केला आहे. "आपण शांततेत आंदोलन करू शकता असा अधिकार घटनेनं जनतेला दिलेला आहे. त्यामुळे शांततेत आमरण उपोषण मी करतोय. मी घटनेला मानायला लागलो. कायदा चालवून घेणाऱ्यांना आता मी मानत नाही. जो कायदा चालवायला मराठ्यांनीच त्या पदावर बसवलंय, ते कायदा पायदळी तुडवायला लागलेत," असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. अंतरवाली सराटीत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं. "४ जूनला आचारसंहिता होती, मी त्याचा सन्मान केला. मी माझं आंदोलन ८ तारखेला पुढे ढकललं. पुन्हा पुन्हा नाकारणार असाल, तर मी तुम्ही नाकारलेल्या परवानगीला मानत नाही. कायद्याला मी मानतो आणि घटनेनं, कायद्यानं मला तो अधिकार दिलेला आहे. मी ८ जूनला सकाळी आमरण उपोषणाला बसणार आहे आणि मी मागे हटणार नाही," असंही त्यांनी काल स्पष्ट केलं होतं.

राजकारण्यांना दिला इशारा

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी शनिवारी ८ जून रोजी अन्नपाण्याचा त्याग करून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. "राजकारण माझा मार्ग नाही आणि मला त्यात जायचेही नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच मागणी असून, ती पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण करणार आहे. सरकारने तातडीने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. मागणीनुसार प्रमाणपत्र द्यावे. मागणी मान्य झाली नाही तर विधानसभा निवडणुकीत सर्व जातीधर्माचे उमेदवार देणार आणि तेव्हा नावे घेत उमेदवार पाडणार," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Web Title: maratha reservation the resolution of the Gram Sabha in Antarwali Sarati on the hunger strike of the manoj jarange How many votes were cast in favor and against

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.