मनोज जरांगेंच्या आरोपात तथ्य नाही; CM एकनाथ शिंदेंनी सुनावलं, देवेंद्र फडणवीसांची पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 03:29 PM2024-08-19T15:29:18+5:302024-08-19T15:30:31+5:30

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना त्यांच्यामुळे आरक्षण मिळत नाही असा आरोप केला होता. त्यावर फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही खुलासा केला आहे. 

Maratha Reservation; There is no truth in Manoj Jarange patil allegations; CM Eknath Shinde support of DCM Devendra Fadnavis | मनोज जरांगेंच्या आरोपात तथ्य नाही; CM एकनाथ शिंदेंनी सुनावलं, देवेंद्र फडणवीसांची पाठराखण

मनोज जरांगेंच्या आरोपात तथ्य नाही; CM एकनाथ शिंदेंनी सुनावलं, देवेंद्र फडणवीसांची पाठराखण

मुंबई - मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतात. त्यात फडणवीसांमुळे मुख्यमंत्री शिंदेंना आरक्षण देता येत नाही असं विधान त्यांनी केले. त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी यावर एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं असं म्हटलं होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत खुलासा करत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.

मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार एकत्र बसलो. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावलं. प्रत्येक बैठकीला देवेंद्र फडणवीस होते. मराठा आरक्षणासाठी जो कायदा केला त्यात फडणवीसांची मोलाची भूमिका होती. अजित पवारही सहभागी होते. मनोज जरांगेंच्या मागणीनुसार मराठवाड्यात ज्यांच्या कुणबी नोंदी ते आम्ही देऊ लागलो. मराठा समाजाला ज्या सवलती होत्या त्या दिल्या. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले त्याला विरोध करायला कोर्टात कोण गेले ते आधी बघा असं त्यांनी सांगितले. 

तसेच मराठा आरक्षण मिळू नये यासाठी विरोधी पक्षाचा हात आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या कारकिर्दीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम झालेले. तेव्हा मीही कमिटीत होतो. देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाला विरोध करतायेत हे पूर्णपणे चुकीचे आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपात तथ्य नाही. आम्ही जो काही निर्णय घेतो तो सर्वानुमते घेतो असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पाठराखण केली. 

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारावर काम करत असतात. एकनाथ शिंदे आणि मी एकत्रित काम करतो. शिंदेंना पूर्ण पाठबळ आणि पाठिंबा माझा आहे. त्यामुळे जरांगेंनी केलेल्या आरोपावर एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी कुठलाही प्रयत्न केला आणि मी तो थांबवला असं शिंदेंनी सांगितले तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्त होईन. आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले ते एकतर मी केले नाहीतर शिंदेंनी केले. एकनाथ शिंदेंच्या पाठिशी मी भक्कपणाने उभा राहिलो आहे. परंतु अशाप्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होते. 

Web Title: Maratha Reservation; There is no truth in Manoj Jarange patil allegations; CM Eknath Shinde support of DCM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.