Maratha Reservation Verdict: 'मराठा' म्हणजे नेमके कोण?... शिवकाळानंतर कशी लागली उतरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 03:55 PM2019-06-27T15:55:47+5:302019-06-27T15:57:20+5:30
मराठा समाजाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा धांडोळा
मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात चर्चेत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आज उच्च न्यायालयानं निकाली काढला. मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण न्यायालयानं कायम ठेवलं आहे. मात्र समाजाला 16 टक्के आरक्षण देता येणार नाही. तर 12-13 टक्के आरक्षण देता येईल, असं न्यायालयानं म्हटलं. या निकालानं राज्य सरकार आणि मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला 12 टक्के आणि शिक्षणात 13 टक्के आरक्षण दिलं जाऊ शकतं, असं न्यायालयानं निकाला देताना म्हटलं.
मराठा समाजाच्या वाटचालीचा इतिहासापासून आतापर्यंत घेतलेला हा धांडोळा...
मराठा म्हणजे नक्की कोण?
‘मराठा’ म्हणजे मराठी भाषिक समाज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या समाजाला मोठे महत्त्व प्राप्त झाले. हा समाज लढवय्या म्हणून ओळखला जातो. स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांबरोबर अनेक लढायांत हा समाज अग्रस्थानी होता. महाराष्ट्राची एक तृतीयांश लोकसंख्या मराठा समाजाची आहे. राज्यातील अन्य समाजांच्या तुलनेने या समाजातील लोक राजकारणात अधिक सक्रिय आहेत. १९६०पासून आतापर्यंत या समाजाचे १८ मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले.
राजकारणात वर्चस्व असूनही हा समाज शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे महाराष्ट्र राज्य मागास प्रवर्ग आयोगाने जाहीर केले. आयोगाच्या म्हणण्यानुसार, शिवकाल संपल्यानंतर या समाजाला उतरण लागली. कोणत्याही राजकीय पक्षाने या समाजाची पुरेशी दखल घेतली नाही, तसेच घरच्या जमिनीचे भावंडांत अनेक तुकडे होत गेले. संपत्तीचे वाटप झाल्याने हा समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत गेला. तरीही ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये या समाजाचा मोठा हातभार आहे.