आम्ही पुरावे देतो, राज्यपालांच्या परवानगीने वटहुकूम काढा; मनोज जरांगेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 06:17 PM2023-09-06T18:17:06+5:302023-09-06T18:18:07+5:30

आंदोलन करून वेठीस धरणे आमचा उद्देश नाही, आम्ही सरकारला संधी दिलीय असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Maratha Reservation: We give proofs, issue ordinances with the permission of the Governor; Manoj Jarang's demand | आम्ही पुरावे देतो, राज्यपालांच्या परवानगीने वटहुकूम काढा; मनोज जरांगेंची मागणी

आम्ही पुरावे देतो, राज्यपालांच्या परवानगीने वटहुकूम काढा; मनोज जरांगेंची मागणी

googlenewsNext

जालना – सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी वेळ लागणार असेल तर एका दिवसात अध्यादेश, जीआर काढता येईल. इतके पुरावे आम्ही द्यायला तयार आहोत. सरकारने यावे पुरावे देतो. मराठवाड्यातील मराठा कुणबी असल्याचे कागदपत्रे आहेत. सरकारचा ४ दिवसांचा वेळ वाया जाऊ नये त्यामुळे आम्ही पुरावे द्यायला तयार आहोत. सरकारने यावे आणि पुरावे घेऊन जावेत. एक दिवसात अध्यादेश निघेल एवढे कायदेशीर पुरावे द्यायला तयार आहोत असं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारची इच्छाशक्ती असली तरी एका कागदावरही अध्यादेश देऊ शकते. आम्हाला सरकारला वेठीस धरायचे नाही. विधानसभा नसली तरी आम्ही जी कागदे देतोय त्याआधारे राज्यपालांच्या आदेशाने वटहुकूम काढू शकता. सरकारने १ महिना असो ४ दिवसांची वेळ वाया घालवू नका. आम्ही तज्ज्ञ द्यायला तयार आहोत, पुरावे द्यायला तयार आहोत. राज्यातील जनतेला आवाहन आहे आपण पुरावे द्यायला तयार आहोत. राज्य सरकारला कायदा बनवायचा अधिकार आहे. आमचे आमंत्रण स्वीकारा आणि मराठा समाजाचे कल्याण करा असं आवाहन मनोज जरांगेंनी म्हटलं.

तसेच आंदोलन करून वेठीस धरणे आमचा उद्देश नाही, आम्ही सरकारला संधी दिलीय. एखादा कायदा बनवण्यासाठी जी कागदपत्रे लागतात ती द्यायला तयार आहोत. आम्ही सरकारचा वेळ वाचवतोय, तुम्हाला कारण ठेवायला जागा ठेवत नाही. आम्हाला समाजाला न्याय द्यायचा आहे. आंदोलन लांबवायचे नाही. तुम्हालाही आंदोलन चिरडायचे नाही, मराठा आरक्षण द्यायचे असेल तर कायद्याच्या चौकटीतले आरक्षण लवकर द्यावे असं मनोज जरांगेंनी सांगितले.

दरम्यान, तुम्ही महिन्याची मुदत मागताय, तुम्ही महिनाभर जो डेटा जमा करणार तो आम्ही तुम्हाला देतो. तुमचा महिनाभर वेळ वाया जाणार नाही. सगळे कागदपत्रे, पुरावे आम्ही देतो, सरकारला पळण्याची गरज नाही. सरकारची अडचण समजून घेणारे आम्ही कोणी नाही, सरकारने जनतेची अडचण समजून घ्यायची आहे. आम्ही मागणी करून पुरावे देतोय, त्यामुळे सरकारच मराठा आंदोलनाला वेठीस धरतंय अशी दाट शक्यता आहे. हे आंदोलन राजकारण्यांनी केले नाही. पूर्वीपासून आम्हाला ओबीसीमधून आरक्षण आहे, ओबीसीच्या ८३ व्या क्रमांकावर कुणबी मराठा आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांनी समन्वयाने घ्यावे. वरचे आपले चांगले होऊ देणार नाही. एकमेकांच्या समन्वयाने पुढे जाऊ. सामान्य ओबीसी, सामान्य मराठा एकत्र येऊन मोठे आंदोलन करू. एकमेकांच्या अंगावर घालायचे काम हे लोकं करतायेत असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

Web Title: Maratha Reservation: We give proofs, issue ordinances with the permission of the Governor; Manoj Jarang's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.