मी आणि दरेकर राजीनामा देतो, पण...; प्रसाद लाड यांचं मनोज जरांगेंना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 02:47 PM2024-07-21T14:47:04+5:302024-07-21T14:48:45+5:30
मराठा आरक्षणावरून सातत्याने सरकारवर टीका करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पुणे - सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना आणली. गोरगरिब कुटुंबाला महिन्याला दीड ते ३ हजार मिळत असतील तर त्याला मनोज जरांगेंनी पाठिंबा दिला पाहिजे, विरोधकांच्या छत्रीखाली जाऊन टीका करू नये. मनोज जरांगेंनी समाजकारणात राजकारण आणू नये. विरोधकाची भूमिका घेऊ नये. जर त्यांना राजकारण करायचं असेल मी आणि प्रविण दरेकर राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या असं आवाहन प्रसाद लाड यांनी केले आहे.
प्रसाद लाड म्हणाले की, मनोज जरांगेनी राजकारणात यावं, आमदार व्हावं आणि एका सहकाऱ्याला सोबत घेत आमदार करावं. विधान परिषदेत त्यांची भूमिका मांडावी. आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी मदत करू. पण मी समाजकारण करणार, राजकारण करणार नाही आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करायची हे योग्य नाही. चर्चेला या, चर्चेतून मार्ग काढू. मराठा आरक्षणासाठी आम्ही नक्कीच तुमच्यामागे आहोत असं त्यांनी सांगितले.
तसेच काही मागण्या या न्यायिक बंधनात असतात. राज्य चालवताना १४ कोटी जनतेचं राज्य चालवायचं असतं. त्यात सर्व समाज असतो ते मायबाप असतात. मग मराठा, ओबीसी, अल्पसंख्याक इतर समाज हे मायबाप आहेत. जेव्हा सर्वपक्षीय बैठक लावली तेव्हा शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे आले नाही. मग या बैठकीस हे नेते का आले नाही हा प्रश्न जरांगे पाटील का विचारत नाही असा सवालही प्रसाद लाड यांनी केला.
दरम्यान, मी पुढाकार घेतो, मुख्यमंत्री, मनोज जरांगे पाटील, शरद पवार आणि त्यांना हव्या त्या नेतृत्वाच्या उपस्थितीत इन कॅमेरा बैठक घेऊ. मीडियाला आमंत्रित करतो. सर्व संपादकांना बोलावू. २०१७ मधील जे नोटिफिकेशन आहे त्यात सगेसोयरेंचाही उल्लेख आहे. त्यामुळे एकदा जरांगे पाटील यांनी चर्चेला यावं. मला कुणाला लपून भेटायची सवय नाही. मी मराठा आहे. अंगावर आलं तर शिंगावर घेतो. मी मनोज जरांगेंचा आदर करतो. मला अनेक धमक्यांचे फोन आले परंतु मी तक्रार करत नाही. कदाचित जरांगेंना कुणीतरी चुकीचं सांगतंय असा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केला.