चिठ्ठीत नेमकं होतं तरी काय? रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांची शिष्टाई ठरली यशस्वी
By विजय मुंडे | Published: September 15, 2023 09:44 AM2023-09-15T09:44:36+5:302023-09-15T09:44:52+5:30
Maratha Reservation: गुरुवारी पहाटेच्या सुमारास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री गिरीश महाजन, आ. नारायण कुचे आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात जवळपास चार तास चर्चा झाली. त्यावेळी जरांगे पाटील आणि दानवे यांच्या हातात एक चिठ्ठी होती.
- विजय मुंडे
जालना - गुरुवारी पहाटेच्या सुमारास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री गिरीश महाजन, आ. नारायण कुचे आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात जवळपास चार तास चर्चा झाली. त्यावेळी जरांगे पाटील आणि दानवे यांच्या हातात एक चिठ्ठी होती. ती चिठ्ठी वाचून त्यांनी चर्चा केली. त्याच चिठ्ठीवरून उलटसुलट चर्चा सुरू असून त्या चिठ्ठीत नेमके काय होते यावर सध्या तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
उपोषण मागे घेतल्यावर गुरुवारी सकाळी जरांगे पाटील यांनी या चिठ्ठीबाबतची वस्तुस्थिती मांडली. त्या चिठ्ठीवरून केल्या जात असलेल्या आरोपांना उत्तर देताना जरांगे म्हणाले की, त्या चिठ्ठीत एका महिन्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सर्वच अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, दाखल खटले त्वरित मागे घेण्याची प्रक्रिया पार पाडावी, मागणी मान्य होईपर्यंत साखळी उपोषण सुरू राहणार या बाबी नमूद होत्या. त्यावरच आमची चर्चा झाली.
‘मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही’
मी तसले धंदे करत नाही. कोणाच्या म्हणण्यावर मी मराठ्यांचे आंदोलन करीत नाही. त्या चिठ्ठीत स्पष्ट आम्ही मागण्या केल्या होत्या. त्या स्वरूपाचे होतेय काय यावर चर्चा झाली. मी पारदर्शक आहे. माझी राखरांगोळी झाली तरी माझ्या मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही. कोणी माझ्यावर आरोप करतोय तो उघडा झाला तर तुमचा एकही पदाधिकारी राहणार नाही. आरक्षणाचा घास आमच्या तोंडाशी आला आहे. काही तरी वायफळ बडबड करू नका. तुमच्या राजकारणामुळे पोरांचा घात करू नका, असेही जरांगे पाटील म्हणाले.
‘हा पठ्ठ्या कष्टाचे खाऊन समाजाचे काम करतो’
माझ्या रानाचा बांध कुठं आहे हे मला माहिती नाही. योगायोगाने बाप इथे आला आहे. माझा बाप कष्ट करतो आणि आम्हा कुटुंबीयांना खाऊ घालतो. हा पठ्ठ्या त्यांच्या कष्टाचे खाऊन मराठा समाजाचे काम
करतो. एकजण जरी मला म्हणाला की तुला रूपया इकडे तिकडे दिला त्याच दिवशी आत्महत्या करेन. आपल्याला ते सहन होणार नाही. जे बेगडी असतील त्यांना ते सहन होईल. मी तसा नाही. त्यामुळे भलतेसलते आरोप मी अजिबात सहन करणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.
दिल्लीतही विचारले, मनोज जरांगे कौन है..?
बाबा, तुझं पोरगं भारी आहे. स्वत:साठी नाही, समाजासाठी लढतेय. ते जेव्हा जेव्हा मला भेटले, तेव्हा वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर समाजाच्या प्रश्नासाठी भेटले. मी परवा दिल्लीला गेलो होतो. तेथे मला विचारलं, मनोज जरांगे कौन है...? असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्या प्रामाणिकपणाला दाद दिली. माझे वडीलही आंदोलनात सहभागी झाले होते. जरांगे यांचा सुरू असलेला लढा प्रामाणिक आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शासनही कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
असे चर्चेत आले अंतरवाली सराटी
२९ ऑगस्ट : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर महामार्गावरील शहागड येथे मोर्चा. त्याच दिवशी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू.
३० ऑगस्ट : शांततेत उपोषण, अनेक गावांमध्ये बंद.
३१ ऑगस्ट : जरांगे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी उपचार घ्यावेत यासाठी पथकाकडून प्रयत्न
०१ सप्टेंबर : अंतरवाली सराटीत उपोषणकर्ते, पोलिसांत शाब्दिक चकमक. पोलिसांकडून लाठीमार.
०२ सप्टेंबर : अंतरवाली सराटीतील लाठीमाराच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यात आंदोलने, जाळपोळ. १७ बसेसह जवळपास १० खासगी वाहने खाक.
०३ सप्टेंबर : विरोधी पक्षातील नेत्यांसह मंत्री अंतरवाली सराटीत. एसपींसह इतर अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठिवले. प्रभारी एसपी. शैलेश बलकवडे रुजू.
०४ सप्टेंबर : ११३ गावांतील नागरिक अंतरवालीत. मंत्रिमंडळाची बैठक. कुणबी दाखल्यासाठी समिती गठित.
०५ सप्टेंबर : शासनाचे शिष्टमंडळ अंतरवालीत. आरक्षणाच्या जीआरसाठी शासनाला ४ दिवसांची डेडलाईन.
०६ सप्टेंबर : जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी, कुणबी दाखले देण्याचे आदेश. समितीचे गठन, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे यांनी शासनाचा निरोप दिला. जरांगे यांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा.
०७ सप्टेंबर : शासनाचा जीआर आला. त्यातील वंशावळीचा शब्द बदलण्याची मागणी. उपोषणावर जरांगे ठाम. शिष्टमंडळ चर्चेला पाठविण्याची तयारी.
०८ सप्टेंबर : अंतरवालीतील शिष्टमंडळ मुंबईत. मुख्यमंंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री, अधिकाऱ्यांसमवेत बैठक.
०९ सप्टेंबर : वंशावळीचा शब्द वगळा, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या मनोज जरांगे यांची मागणी. शासनाची तिसऱ्या वेळची शिष्टाई अयशस्वी.
१० सप्टेंबर : चार दिवसांची मुदत संपली, आमरण उपोषणावर जरांगे ठाम.
११ सप्टेंबर : सरकारने बोलाविली सर्वपक्षीयांची बैठक. उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य. मराठा आरक्षणावर एकमत. तीन अधिकाऱ्यांचे निलंबन. अंतरवालीत जखमींचे नोंदविले जबाब.
१२ सप्टेंबर : जरांगे यांनी घातल्या पाच अटी, अटी मान्य केल्या तरच उपोषण मागे घेऊ. मुख्यमंत्र्यांशी मोबाइलवर चर्चा. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको म्हणून जालन्यात ओबीसींचे आंदोलन
१३ सप्टेंबर : उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही मराठा आंदोलनाबाबत त्वरित पावले उचलण्याचे दिले निर्देश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री, अधिकारी येणार असल्याची दिवसभर चर्चा. दौरा आला परंतु, मुख्यमंत्री आले नाहीत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री गिरीश महाजन यांची रात्री ११ ते ३ पर्यंत मनोज जरांगे आणि शिष्टमंडळासमवेत चर्चा.
१४ सप्टेंबर : सकाळी १०:४५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मंत्री अंतरवाली सराटीत दाखल. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण मागे. साखळी उपोषण सुरू.