जरांगेंचा इशारा, सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी कधी?; चंद्रकांत पाटलांनी दिलं थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 09:52 AM2024-07-07T09:52:54+5:302024-07-07T09:54:24+5:30

चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या सगेसोयरे अधिसूचनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

maratha reservation When will Sagesoyere Notification be implemented Chandrakant Patil gave a direct answer | जरांगेंचा इशारा, सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी कधी?; चंद्रकांत पाटलांनी दिलं थेट उत्तर

जरांगेंचा इशारा, सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी कधी?; चंद्रकांत पाटलांनी दिलं थेट उत्तर

Chandrakant Patil ( Marathi News ) : आरक्षण प्रश्नावरून महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपासून मोठा गदारोळ सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारल्यानंतर ओबीसी नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत या मागणीला कडाडून विरोध केला आहे. या दोन्ही घटकांच्या आंदोलनामुळे राज्य सरकार कोंडीत सापडल्याची स्थिती आहे. अशातच भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या सगेसोयरे अधिसूचनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, "सरकारने जी सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढलेली आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: ड्राफ्ट केलेली आहे. सरकारने ती त्यांच्यावर थोपवलेली नाही. या अधिसूचनेवर ८ लाखांच्या आसपास सूचना आणि हरकती आलेल्या आहेत. या हरकती तपासल्यानंतर आम्ही अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करणारच आहोत. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजाने घाबरण्याचं काहीच कारण नाही, हे आम्ही ओबीसी समाजाला समजावून सांगत आहोत. ही अधिसूचना निघाल्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का बसत नाही. एखाद्याचं कुणबी प्रमाणपत्र सापडल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनाही हे प्रमाणपत्र मिळावं, अशी ती अधिसूचना आहे," अशा शब्दांत पाटील यांनी सरकारची भूमिका मांडली. 

दरम्यान, २०१७ सालीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना याबाबत एक निर्णय घेतला होता. रक्तसंबंधांमध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही, असा कायदा केला होता, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

मनोज जरांगेंचा इशारा 

मनोज जरांगे पाटील यांनी सध्या मराठा शांतता रॅलीला सुरुवात केली आहे. "सरकारने आता मराठा समाजाचा संयम पाहू नये. १३ जुलैपर्यंत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण द्यावे व सगेसोयरे कायदा अमलात आणावा, अन्यथा त्यानंतरची भेट थेट मुंबईत होईल," असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी हिंगोलीत संवाद रॅलीदरम्यान दिला. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत संवाद रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला ६ जुलैला हिंगोलीतून प्रारंभ झाला. यावेळी मराठा समाजबांधवांशी संवाद साधताना जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांवर कडाडून टीका केली. भुजबळांचे ऐकून मराठ्यांचे नुकसान करू नका, नाही तर या सरकारला जड जाईल. मराठ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर २८८ पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून येऊ देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला. 
 

Web Title: maratha reservation When will Sagesoyere Notification be implemented Chandrakant Patil gave a direct answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.