छगन भुजबळांमागे मास्टर माईंड कोण?; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 07:08 PM2023-11-06T19:08:04+5:302023-11-06T19:08:33+5:30
आमच्यावर झालेला हल्ला कुणी कट घडवून आणला हे कळू द्या असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जालना – आमच्या हक्काचं आरक्षण असून आम्हाला मिळत नाही. आम्ही ओबीसींना टार्गेट केले नाही. जिथं जिथं ओबींसीवर अन्याय झाला तिथे भुजबळ जात नाहीत, सोयीनुसार भूमिका घेतात. छगन भुजबळांची दिशा चुकतेय. छगन भुजबळच मास्टरमाईंड आहे, त्यांच्यामागे कोण असणार? ते कोणाला टिकून देणार आहेत. सभा घेण्याचा त्यांना अधिकार आहे. पोटात असलेले होठात आले. करेंगे या मरेंगे हा शब्द म्हणजे तुम्ही राज्यात हिंसाचार घडवायला निघाला का? असा थेट सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना विचारला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळांच्या शब्दाचा अर्थ भयनाक आहे. आम्ही भुजबळ यांचे इतके काय वाईट केले. माझे उपोषण सोडायला ओबीसी मंत्री होते, त्यांनाही मराठ्यांना आरक्षण मिळावे असे वाटते. तुम्हाला एकट्याला असं का वाटते? आमचे नुकसान झाले, आम्ही सभा घेतल्या, तरी भुजबळ आमच्याकडे आले नाहीत. सगळ्यांना वाटते, मराठ्यांनी आमच्यावर थोडेफार उपकार केलेत, मग भुजबळांना का वाटत नाही? आरक्षणापासून मराठे मरणार नाहीत. ओबीसींचे गावागावातील पोरंही मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी पुढे येतील हे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल असं त्यांनी म्हटलं.
तसेच आम्ही हिंसाचाराचे समर्थन केले नाही, पहिल्या दिवसापासून आम्ही उग्र आंदोलन करू नका असं म्हटलं. भुजबळ म्हणतात, ओबीसी, माळी समाजाला टार्गेट केले गेले. पण बीडमध्ये तुम्ही गेला, तिथे पाहणी केली, आम्ही कुठे म्हटलं तुम्ही ओबीसी म्हणून गेलात, तशीच घटना आमच्याकडेही झाली, मग आमच्याइथं तुम्ही भेटायला आला नाही. माणसानं भानावर येऊन बोलावे, आमचे साखळी उपोषण करणारे, मराठा समाजाचे शांततेत आंदोलन करणाऱ्या मुलांना टार्गेट करून त्यांना आतमध्ये टाकले जातंय. विनाकारण मराठा मुलांवर कारवाई करू नका अशी मागणी आमची आहे. आयोगाच्या माध्यमातून जे जास्तीचे आरक्षण खाल्ले जातंय ते मराठ्यांना द्या, ओबीसीतून कुठली जात काढा हे आम्ही म्हटलं नाही. आमचे आरक्षण आम्हाला द्या असं आम्ही म्हणतोय असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना दिले.
दरम्यान, भुजबळ खालच्या पातळीवर बोलतायेत, न्यायदानाचे काम न्यायाधीश करतायेत, त्यांनी जीव वाचवण्याचे काम केले, आम्ही जनतेत आहोत. न्यायाधीशांबद्दल अशी भाषा असेल तर काय बोलावे? तुम्ही जीव वाचवायला आला नाही तर जीव घ्यायला आला होता. पोलिसांवर दगडफेक केला हे षडयंत्र आहे. जनतेचं काही देणेघेणे नाही. उच्चस्तरीय चौकशी लावा, आमच्यावर झालेला हल्ला कुणी कट घडवून आणला हे कळू द्या. पोलीस आता बोलतायेत, त्यांच्यावर काय दडपण आहे, सर्व प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली.