मराठा क्रांतीचा नि:शब्द हुंकार
By admin | Published: September 22, 2016 02:58 AM2016-09-22T02:58:15+5:302016-09-22T02:58:15+5:30
कोकणभवन व सिडको मुख्यालय परिसरात चार दशकांमध्ये झालेल्या सर्व आंदोलनातील गर्दीचा विक्रम मराठा क्रांती मोर्चाने मोडला.
नवी मुंबई : कोकणभवन व सिडको मुख्यालय परिसरात चार दशकांमध्ये झालेल्या सर्व आंदोलनातील गर्दीचा विक्रम मराठा क्रांती मोर्चाने मोडला. रायगड जिल्ह्यातील मावळ्यांसह नवी मुंबईमधील मराठा समाजाने स्वयंशिस्तीने आंदोलन कसे असावे याचा आदर्श निर्माण केला व ‘एक मराठा लाख मराठा’ ही घोषणा प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली.
रायगड जिल्ह्यातील चरीकोपर येथे अन्यायकारक खोती पद्धत नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांनी १९३३ मध्ये ऐतिहासिक संप पुकारला. जगाच्या इतिहासामध्ये सहा वर्षे सुरू असलेला तो एकमेव संप. तेव्हापासून रायगड जिल्ह्यातील शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचा सुरू झालेला संघर्ष अद्याप थांबलेला नाही. नवी मुंबई वसविण्यासाठी शासनाने जमिनी संपादित केल्यानंतर दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन सुरू करण्यात आले. यानंतर जेएनपीटी, विमानतळ व ते गरजेपोटी बांधलेली घरे वाचविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी व शहरातील इतर नागरिकांनी विविध प्रश्नांसाठी सिडको, कोकणभवन व महापालिकेवर शेकडो मोर्चे काढले. आतापर्यंतच्या आंदोलनामध्ये मराठा क्रांती मोर्चाने गर्दीचा नवीन विक्रम केला. खारघरमधील सेंट्रल पार्कवरून कोकणभवनपर्यंत अत्यंत शांततेमध्ये मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. प्रतिक्रिया व्यक्त करताना महिलांनी सांगितले की, कोपर्डीमध्ये एका युवतीवर अत्याचार झाला. तिचा छळ करून खून करण्यात आला. अशाप्रकारची घटना पुन्हा कुठेच घडू नये यासाठी आरोपींना तत्काळ शिक्षा व्हावी या मागण्यांसाठी आम्ही सहभागी झालो आहोत. दोन वर्षांच्या मुलांपासून ते महाविद्यालयीन युवक व युवतीही मोर्चात सहभागी झाले होते. याविषयी विचारले असता समाजासाठी सुरू असलेल्या लढ्याचे संस्कार मुलांवर झाले पाहिजेत याचसाठी त्यांना मोर्चात घेवून आल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली. आता नाही तर कधीच नाही यामुळे पूर्ण परिवारासह आम्ही मोर्चात सहभागी झालो होतो, अशा प्रतिक्रियाही यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.
चार लाखांचा समुदाय कोणतीही घोषणा न देता पुढे सरकत होता. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत व शेतकऱ्यांपासून डॉक्टरपर्यंत सर्वच मोर्चात सहभागी होते. एकही घोषणा न देता ‘एक मराठा लाख मराठा’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरविण्यात आले. आंदोलनासाठी कोणालाही गाडी पुरविण्यात आली नाही. आंदोलनासाठी जेवण, नाष्ट्याची सोयही केली नाही. प्रत्येक नागरिकाला स्वखर्चाने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. सोशल मीडियावरील आवाहनावर मराठा समाजाने मोर्चासाठी केलेली गर्दी लक्षणीय ठरली.
>अॅट्रॉसिटीत सुधारणा
अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरूपयोग टाळला पाहिजे. हा कायदा केला त्यावेळची व आताची परिस्थिती यामध्ये फरक आहे. या कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करावे, अशी मागणी तरूणांनी यावेळी केली. आरक्षणाबरोबर अॅट्रॉसिटीमधील बदलाविषयीचे सर्वाधिक फलक आंदोलकांच्या हातामध्ये दिसत होते.