आमदारांना धडकी भरविणारी मनोज जरांगेंची घोषणा; विधानसभेला सर्व २८८ जागांवर उमेदवार देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 01:55 PM2024-04-26T13:55:12+5:302024-04-26T13:55:51+5:30
Manoj Jarange Patil Voting: मराठा समाजाचे उमेदवार देणार असल्याचीही घोषणा जरांगे यांच्याकडून देण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात मराठा क्रांती मोर्चाकडून एकही उमेदवार उभा राहिलेला नाही. अशातच जरांगे यांनी आमदारांची धाकधुक वाढविणारी घोषणा केली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघेही सारखेच आहेत. यामुळे कोणालाही पाठिंबा देणार नाही असे काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटलांनी जाहीर केले होते. लोकसभेच्या तोंडावर जरांगे यांनी मोठे आंदोलन उभारल्यामुळे सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले होते. तसेच मराठा समाजाचे उमेदवार देणार असल्याचीही घोषणा जरांगे यांच्याकडून देण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात मराठा क्रांती मोर्चाकडून एकही उमेदवार उभा राहिलेला नाही. अशातच जरांगे यांनी आमदारांची धाकधुक वाढविणारी घोषणा केली आहे.
लोकसभेला जरी उमेदवार उभे केलेले नसले तरी विधानसभेला सर्वच्या सर्व २८८ जागांवर उमेदवार देणार आहोत. आता कोणाला पाडा हे सांगितलेले नाही. पण त्याचा कोणी गैर अर्थ काढू नये. मी किंवा समाजाने कोणाला पाठिंबा दिलेला नाही. तसेच एकही अपक्ष उमेदवार उभा केलेला नाही, असे जरांगे यांनी जाहीर केले.
मनोज जरांगे यांनी आज परभणी लोकसभा मतदारसंघातील शहागडच्या गोरी गांधारी येथे मतदानाचा हक्क बजावला. दोन दिवसांपूर्वी जरांगे यांना प्रकृती खालावल्याने बीडहून छत्रपती संभाजीनगरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आजारी असल्याने जरांगे मतदानासाठी अॅम्बुलन्समधून आले होते. आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
समाजाला आवाहन करतो की, मराठा आणि कुणबी यांच्या बाजूने असणाऱ्या उमेदवाराला सहकार्य करावे. एखाद्याला पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय आहे, यावेळेस पाडणारे बना. जो उमेदवार सगे सोयऱ्यांच्या बाजुचा आहे त्याला मतदान करावे, असे जरांगे म्हणाले. मराठ्यांना बरोबर माहितीय की कोणाला मतदान करावे. आंबेडकर किंवा छत्रपतींच्या गादीचा मान राखायला हवा, असेही जरांगे यांनी सुचविले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंसमोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु तो मराठा समाजाने नाकारला होता. यामुळे जरांगे यांनी लोकसभेला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता.