अहमदनगरमध्ये मराठा समाजाचा महामोर्चा

By admin | Published: September 24, 2016 03:49 AM2016-09-24T03:49:19+5:302016-09-24T03:49:19+5:30

कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना फाशी द्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा

Maratha Samaj's Mahamarchar in Ahmednagar | अहमदनगरमध्ये मराठा समाजाचा महामोर्चा

अहमदनगरमध्ये मराठा समाजाचा महामोर्चा

Next


अहमदनगर : कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना फाशी द्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा, या आणि इतर मागण्यांसाठी आजवरच्या गर्दीचे उच्चांक मोडणारा विराट असा मूक मोर्चा शुक्रवारी नगरमध्ये सकल मराठा समाजाने काढला. पावसाचे वातावरण असतानाही अवघा समाज या मोर्चासाठी एकवटला होता.
कोपर्डी अत्याचाराची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आणि याच घटनेमुळे राज्यात सकल मराठा समाजाच्या मोर्चांची मालिका सुरू झाल्यामुळे येथील मोर्चाबाबत सर्वांना उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे हा मोर्चा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. उत्स्फूर्तपणे सहकुटुंब माणसे मोर्चात उतरली होती. नगर शहरात रात्रीपासूनच पावसाचे वातावरण होते. पण त्याची तमा न बाळगता पहाटेपासूनच मोर्चेकरी शहरात दाखल झाले.
शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुल तुडुंब भरले होते. तेथून मोर्चाचे व्यासपीठ असलेला चांदणी चौकापर्यंतचा रस्ता तसेच शहरातून जाणारे सातही महामार्ग गर्दीने व्यापले होते. या प्रत्येक महामार्गावर आठ किलोमीटरच्या परिसरापर्यंत मोर्चेकरी होते. लाखो लोकांना नगर शहरात प्रवेशही करता आला नाही. शहरातील अंतर्गत रस्तेही गर्दीने व्यापले होते. त्यामुळे शहर सकाळपासून अक्षरश: थांबून गेले होते. सर्वत्र भगवे ध्वज, ‘मराठा क्रांती’च्या पांढऱ्या टोप्या व ‘एक मराठा-लाख मराठा’ असे फलक होते. कुठलीही घोषणा न देता शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा निघाला. स्वयंसेवकांनी अत्यंत नियोजनपूर्वक गर्दी नियंत्रित केली. पोलिसांना काहीही हस्तक्षेप करावा लागला नाही. मोर्चात ज्येष्ठांसह, महिला व तरुण-तरुणींची संख्या लक्षणीय होती.
मोर्चेकऱ्यांच्या वतीने किरण गव्हाणे, लोकिता साठे, सायली चितळे, सिद्धी शिंदे, ऋषाली कोहोक, अनुराधा बेरड, ऐश्वर्या अजबे, माधवी काकडे या आठ मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर मोर्चाच्या व्यासपीठावर संस्कृती वाघस्कर, आदिती दुसुंगे, राधा पवार, वैष्णवी मोकाने, विद्या कांडेकर, जयश्री कवडे, अश्विनी जगदाळे या मुलींनी आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी, कोपर्डी अत्याचार, शेतकरी आत्महत्या या विषयांवर आक्रमक भाषणे करून मागण्या मांडल्या. भाषणांपूर्वी कोपर्डीतील अत्याचारित मुलगी व उरी येथील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पावणेएक वाजता राष्ट्रगीताने मोर्चा विसर्जित झाला. त्यानंतर शहरातील गर्दी ओसरून महामार्ग सुरळीत होण्यासाठी तीन तास लागले. (प्रतिनिधी)
>नेते वाडिया पार्कात बसून
मोर्चासाठी विरोधी पक्षनेते, माजी महसूलमंत्री, आजी-माजी मराठा आमदार सकाळी सात वाजताच शहरात दाखल झाले. मोर्चात महिला अग्रभागी, नंतर सामान्य माणसे व सर्वात शेवटी नेते असे धोरण ठरलेले होते. मात्र, गर्दीच एवढी होती की नेत्यांना वाडिया पार्क या क्रीडा संकुलातून बाहेरच पडणे शक्य झाले नाही.
पीडित मुलीच्या कुटुंबाचा सहभाग
कोपर्डी येथील पीडित मुलीचे वडील, सरपंच तसेच ग्रामस्थ मोर्चात सहभागी झाले होते. ते कोपर्डीहून मशाल घेऊन आले होते. ‘घटनेनंतर राज्यातील सर्व मराठा समाज आपल्या पाठीशी उभा राहिला त्याबद्दल आपण आभारी आहोत. अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी व्हावी अशी आपली मागणी आहे. मात्र, पोलिसांनी अद्यापही आरोपपत्र दाखल केलेले नाही, अशी खंत पीडित मुलीच्या वडिलांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
>शहरात दिवसभर
चारचाकी वाहनच नाही
नगर शहर हे राज्याच्या मध्यवर्ती आहे. पुणे, औरंगाबाद, सोलापूर, कल्याण, दौंड, बीड, शिर्डी अशा सर्व बाजूने येणारी वाहतूक मोर्चामुळे बाह्यवळण रस्त्यांनी वळविण्यात आली होती. त्यामुळे पहाटेपासून दुपारी चार वाजेपर्यंत अशी सुमारे दहा तास एकही एसटी अथवा मालमोटार शहरातून धावू शकली नाही. तीनही बसस्थानकांवर अक्षरश: शुकशुकाट होता. असे शहराच्या इतिहासात प्रथमच घडले.

Web Title: Maratha Samaj's Mahamarchar in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.