१६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 07:17 PM2024-02-03T19:17:57+5:302024-02-03T19:18:27+5:30

गुलाल उधळला मग पुन्हा उपोषण कशाला, कोणासाठी या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? असा घणाघात मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. 

Maratha vs OBC: I resigned from the ministry on November 16; Big secret explosion of Chhagan Bhujbal | १६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

१६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

अहमदनगर - Chhagan Bhujbal resigned ( Marathi News ) मी अशी भाषणे करतो, सरकारमधले, विरोधी पक्षातील सगळे बोलतात, तुम्ही राजीनामा द्या, हिंमत असेल तर राजीनामा द्या. माझ्या सरकारमधीलही नेते बोलतात. काल-परवा एकजण बडबडला. या भुजबळाला कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळाला बाहेर हाकला असं म्हणाला. मला त्या सर्वांना विरोधी पक्ष, स्वपक्षातील, सरकारला सांगायचे आहे. १७ नोव्हेंबरला जालनातील अंबडला रॅली झाली. १६ नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर अंबडच्या सभेला रवाना झालो. लाथ मारण्याची मला गरज नाही. अडीच महिने मी शांत राहिलो, याची वाच्यता नको असं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. लाथ मारायची गरज नाही. मी शेवटपर्यंत ओबीसीसाठी लढणार आहे असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला. 

अहमदनगरच्या ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ म्हणाले की, ३६० कोटी रुपये देऊन खोटा रेकॉर्ड केला जात आहे. नोंदीमध्ये खाडाखोड केली जातेय. सगेसोयरे म्हणून खोटी प्रमाणपत्रे दिली जातायेत. हायकोर्टाचा निकाल आहे. त्यात न्यायाधीशांनी स्पष्ट म्हटलंय, सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे दिली तर ओबीसींची आरक्षण संपून जाईल असं निकालात सांगितलं आहे. खोटी वंशावळ जुळवण्याचे प्रकार वाढणार आहेत. खोटे प्रमाणपत्र देऊन कुणबी दाखले देण्याचे प्रकार माझ्या हाती आलेत. झुंडशाहीने असं कुणी आरक्षण घेतले तर त्याला कोर्टात आव्हान देता येईल असं निकालपत्रात सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे असं त्यांनी सांगितले. मागासवर्गीय आयोगाचा सर्व्हे सुरू आहे तो सगळा खोटा आहे. घराघरी जातायेत, १८० प्रश्न आहेत. एका घराला दीड तास लागतो. तपासणी करणारे कधी २५, कधी ५० घरांची तपासणी केली सांगून टाकतात. त्यात केवळ जात विचारली जाते, बाकी सगळे आपोआप भरले जाते. बंगला असला तरी झोपडी, घराबाहेर गाड्या असल्या तरी काहीच नाही सांगितले जाते. ३ न्यायाधीश बसले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशापेक्षा डबल पैसे घेतात. गुलाल उधळला मग पुन्हा उपोषण कशाला, कोणासाठी या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? असा घणाघात मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. 

तसेच एक एक मागणी उपोषणकर्त्याकडून केली जाते. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर ओबीसीला मिळणाऱ्या सर्व सुविधा त्यांना द्यायच्या, मग त्या सुविधा ब्राह्मण, जैन, सर्व गोरगरिबांना देऊन टाका. ज्यादिवशी मागणी केली जाते त्यादिवशी जीआर काढला जातो. कोर्टाचे अनेक निकाल आले आहेत. परंतु तरीही राज्यात हे सर्व सुरू आहे. मग मराठा समाजाला ४० लाखांपर्यंत विना व्याज कर्ज दिले जाते, मग ते ओबीसी समाजालाही द्या अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे. सर्वांनी ठरवलं तर एकत्र यायचे तर सर्वकाही होईल असंही आवाहन छगन भुजबळांनी केले. 

दरम्यान, मला मराठा समाजाच्या नेत्यांची, विचारवंताची कीव येते, हा तुमचा नेता कसा? जो बजेटमधून आरक्षण देता येते का बघा असं म्हणतो, कुणी बोलायला तयार नाही. कुणाच्या मागे जाताय? गावागावात दरी पडतेय, आम्ही आमच्या हक्काची लढाई लढतोय. मराठा समाजाला त्यांचे वेगळे आरक्षण द्या आणि आमच्यातून नको असं बोलणं चूक आहे. ओबीसीतून आरक्षण घ्यायचे आणि मंडल आयोगालाच आव्हान देण्याची भाषा केली जाते. काय हुशार, दादागिरी करायची. तुम्ही सगळे एकत्रित राहा. एकावर अन्याय झाला तर सगळ्यांनी एकत्रित उभं राहिले पाहिजे असं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

Web Title: Maratha vs OBC: I resigned from the ministry on November 16; Big secret explosion of Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.