इतरांच्या हक्काला धक्का न लावता मराठा आरक्षण देणारच; मुख्यमंत्री शिंदेंचा शब्द
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 09:27 AM2023-12-06T09:27:34+5:302023-12-06T09:28:44+5:30
परळीतील कार्यक्रमात मांडली सरकारची भूमिका
अविनाश मुडेगावकर/संजय खाकरे
परळी (जि. बीड) : आपण मराठा समाजाला आरक्षण देणारच आहोत. परंतु ते देताना इतर समाजाच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही, याची काळजी घेतली जाईल. हक्काचे, टिकणारे आणि कायद्यात बसणारे आरक्षण मराठा समाजाला देणारच, ही सरकारची ठाम भूमिका असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
परळीत आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा, लाट संपली, असे म्हणणाऱ्यांना हा निकाल मुंहतोड जवाब आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही पुन्हा मोदी हेच पंतप्रधान राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून आतापर्यंत १ कोटी ८४ लाख लोकांना लाभ झाल्याचा दावाही शिंदे यांनी केला.
‘विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे’
शासन आपल्या दारी कार्यक्रम बोगस आहे, असे काही लोक सांगतात. परंतु जे अडीच वर्षे घरात बसले, त्यांना कार्यक्रम काय कळणार? शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव त्यांना नाही. या कार्यक्रमाला बोगस काय म्हणतात, त्यांनी तर अडीच वर्षे घरात बसून बोगसगिरी केली, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. या कार्यक्रमांची गर्दी पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही आम्हाला दोन तृतीयांश बहुमत मिळाले असून, त्याचीच ही पोटदुखी असल्याचेही शिंदे म्हणाले.
मुंडे बहीण-भाऊ एकत्र
भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे हे आतापर्यंत राजकीय विरोधक होते. परंतु सध्या महायुतीचे सरकार असल्याने हे दोघे पहिल्यांदाच मंगळवारी परळीत एकाच व्यासपीठावर आले. या दोघांनी जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासासाठी एकत्रित राहावे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तर आम्ही यांच्या भक्कमपणे पाठीशी राहू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बीड जिल्ह्याच्या पीक विमा पॅटर्नचा राज्यभरात वापर
अवकाळी पाऊस व अतिवृष्टी याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. बीड जिल्ह्याचा पीक विमा पॅटर्न राज्यासाठीही वापरत आहोत. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभे असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे आदींची उपस्थिती होती. परळी येथे आयाेजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपस्थित डावीकडून माजी मंत्री पंकजा मुंडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषिमंत्री धनंजय मुंडे.