मराठा तरुणांना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या एकाच क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 03:57 PM2022-10-28T15:57:42+5:302022-10-28T15:58:23+5:30
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांना सर्वप्रथम १० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे
मुंबई - केवळ नोकरीवर अवलंबून न राहता, तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि त्याकरिता त्यांना विनासायास अर्थसाहाय्य मिळावे, याकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे १० हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची योजना जाहीर झालेली आहे. व्यवसायासाठी इच्छुक तरुणांना या योजनेचा मोठा लाभ मिळू शकतो.
शासनाच्या या कर्ज योजनेमुळे मराठी तरुणांचे उद्योजक बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
काय आहे योजना ?
ही योजना मराठा समाजातील तरुणांसाठी आहे. या योजनेकरिता १० हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम तरुणांना व्यवसायासाठी कर्जापोटी प्राप्त होईल. विशेष म्हणजे, या योजनेकरिता देण्यात येणाऱ्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. बिनव्याजी अशी ही कर्ज योजना आहे.
आधी दहा हजार, ५० हजार, नंतर १ लाख
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांना सर्वप्रथम १० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. कर्जापोटी देण्यात येणाऱ्या रकमेचा विनियोग त्यांनी कसा केला आहे, हे तपासतानाच त्या कर्जाची परतफेड नियमित केली असेल तर पुढच्या टप्प्यांत त्यांना ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम कर्जापोटी प्राप्त होऊ शकेल. या ५० हजार रुपयांच्या कर्जाचीदेखील नियमित कर्जफेड केली तर त्यापुढील टप्प्यांत या तरुणांना एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम कर्जापोटी मिळू शकेल.
परतफेड प्रतिदिन १० रुपये
जेव्हा तरुणांना सर्वप्रथम १० हजार रुपयांचे • कर्ज मिळेल, तेव्हा या कर्जाची परतफेड प्रति दिन १० रुपये याप्रमाणे करावी लागेल. कर्जाची मर्यादा १० हजारांवरून वाढून जेव्हा ५० हजार रुपये इतकी होईल, त्यावेळी या तरुणांना कर्जाची परतफेड प्रतिदिन ५० रुपये याप्रमाणे करावी लागेल.
१) ५० हजार रुपयांवरून जेव्हा कर्जाची मर्यादा ३ एक लाख रुपये इतकी वाढेल, त्यावेळी कर्जाची परतफेड करताना या तरुणांना प्रतिदिन १०० रुपये याप्रमाणे परतफेड करावी लागेल. वयोमर्यादा ६० वर्षे करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता
आधार कार्ड
रहिवासी पुरावा
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र
अर्ज कुठे करायचा? - या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येईल.