#MarathaReservation : मराठा युवकांचा 'सारथी' अजूनही कागदावरच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 07:51 PM2018-08-07T19:51:45+5:302018-08-07T20:17:36+5:30
मराठा समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्था स्थापन होऊन दीड महिना उलटूनही संस्थेच्या कामाला वेग आलेला नाही.
प्रज्ञा केळकर -सिंग /नेहा सराफ :
मराठा समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्था स्थापन होऊन दीड महिना उलटूनही संस्थेच्या कामाला वेग आलेला नाही. मोठ्या उत्साहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उदघाटन केलेल्या संस्थेचे कार्यालयही अजून तयार झालेले नाही. त्यामुळे सारथीला सरकारचे वेगवान सारथ्य नसल्याने संस्था अजूनही कागदावरच असल्याचे समोर आले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाच्या (बार्टी) धर्तीवर मराठा समाजासाठी सारथी संस्था उभी करण्याची करण्याची घोषणा नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनात करण्यात आली होती. मराठा, कुणबी व शेती व्यवसायातील बहुजन समाज यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासावर प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी, प्रश्न जाणून घेऊन त्याचा सविस्तर अभ्यास, उपायोजनांसाठी ‘सारथी’ची स्थापना करण्यात येणार असल्याचा उद्देशही सांगण्यात आला. त्यानुसार राज्य सरकारने ३ जानेवारी २०१७ रोजी संत साहित्याचे अभ्यासक डॉ सदानंद मोरे अध्यक्षतेखाली संस्थेची रचना, कार्य, उद्देश ठरविण्यासाठी समिती नेमली.
या समितीला काम करण्यासाठी सुरुवातीला पुण्यातील बालचित्रवाणी संस्थेमध्ये कार्यालय उपलब्ध करुन देण्यात आले. २५ जून रोजी संस्थेची अधिकृत नोंदणी करण्यात आली. त्यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात संस्थेचे काम वेगाने सुरु करण्याची ग्वाहीही देण्यात आली. मात्र अद्यापही संस्थेचे अधिकृत कार्यालय सुरु झालेले नाही. सध्या संस्थेचे काम समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत सुरु असून आवश्यक अधिकाऱ्यांची नेमणूक होणेही बाकी आहे. संस्थेचे अकाउंट काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने निधी किती मिळणार, कुठून वर्ग केला जाणार याबद्दलही प्रश्नचिन्ह आहे. फक्त नोंदणी झाल्याच्या जोरावर, यंत्रणा नसताना, कार्यालयही तयार नसताना संस्थेच्या उदघाटनाचा कार्यक्रम कसा झाला असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्रतिक्रिया :
२५ जुलै रोजी ‘सारथी’ची अधिकृत नोंदणीची घोषणा करण्यात आली. संस्थेवरील पदाधिका-यांची नियुक्ती, शासनाकडून मिळणारा निधी अशा अनेक तांत्रिक बाबींवर काम सुरु आहे. ‘बालचित्रवाणी’मधील सारथीच्या कार्यालयाचे नुतनीकरण सुरु आहे. लवकरच संस्थेच्या कामाला वेग येईल.
- डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष 'सारथी'
सारथीच्या रचनेचा क्रम
- ९ डिसेंबर २०१६ : विधीमंडळात सारथी उभारण्याची घोषणा
- ३ जानेवारी २०१७ : डॉ सदानंद मोरे यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक
- २५ जून २०१७ : संस्थेची अधिकृत नोंदणी व उदघाटन समारंभ
- आज दिनांक : कार्यालय तयार नाही, आवश्यक अधिकाऱ्यांच्या नेमणुका नाहीत