"मराठे एकदिवस मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत", प्रसाद लाड यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 09:55 AM2024-09-08T09:55:53+5:302024-09-08T09:56:41+5:30
Prasad Lad : एक दिवस हेच मराठे मनोज जरांगे पाटील यांचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. शनिवारी (दि.७) प्रसाद लाड हे मुंबईत बोलत होते.
मुंबई : दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलीच जुंपली होती. यावरून आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचे काम केले. एक दिवस हेच मराठे मनोज जरांगे पाटील यांचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. शनिवारी (दि.७) प्रसाद लाड हे मुंबईत बोलत होते.
"ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांची वक्तव्ये येत आहेत. याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर आणखी काय म्हणायचं? विरोधात बोलणारं प्रत्येक जण देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे, म्हणतात. प्रत्येक जण हा भाजपचा माणूस म्हणतात. हा मात्र शरद पवार आणि महाविकास आघाडीचा माणूस आहे. ज्या पद्धतीने जरांगेंनी मराठ्यांचं नुकसान केलं. ईडब्लूएस बद्दल चुकीची माहिती दिली. मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं. एक दिवस हेच मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत", असे प्रसाद लाड म्हणाले.
याचबरोबर, "मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर चर्चेला या. देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा. ज्या वेळी मी बोललो, प्रवीण दरेकर बोलले. त्यानंतर हे सर्व नेते आणि मराठा आमदार बोलले असते. तर तुमच्यावर चढलेल्या माजाची चादर टराटरा फाटली असती. राजेंद्र राऊतांना म्हणता तुम्हाला घरात येऊन बघून घेतो. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात २८८ उमेदवार उभे करा. राजा तुमच्यामागे आम्ही मराठे एक आहोत. ताकदीने उभे राहू. याचा ढोंगीपणा उघड करु", असे म्हणत प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणावरुन बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलीच जुंपली होती एकमेकांकडून आव्हान-प्रतिआव्हान देण्यात आले. मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीकडून लिहून घ्या, असे आव्हान राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिले. तसेच, मी फुकलो असतो तर उदयनराजे पडले असते, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते, असा आरोपही राजेंद्र राऊत यांनी केला होता. दरम्यान, राजेंद्र राऊत यांच्या आरोपांना मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मी राजगादीचा किती आदर करतो, हे उदयन महाराजांना माहिती आहे. तुम्ही मराठ्यांचे तुकडे पाडायला बसलात, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. शिवाय, राजेंद्र राऊत बोलत नाहीत, तर त्यांना देवेंद्र फडणवीस बोलायला सांगतात, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.