भाजपाकडून 'मराठेशाही'चा विस्तार; राज्यसभेवर दोन छत्रपतींसोबत एक 'सरदार'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 02:36 PM2020-03-12T14:36:06+5:302020-03-12T14:38:32+5:30
सातारा आणि कोल्हापूर गादीच्या दोन्ही छ्त्रपती व्यतिरिक्त मराठेशाहीचे मातब्बर सरदार घराणे असलेल्या शिंदे घराणेही भाजपमध्ये दाखल झाले आहे.
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नाव निश्चित केले आहे. उदयनराजे यांच्यासह भाजपमध्ये दाखल झालेले काँग्रेसनेते ज्योतिरादित्य शिंदे यांनाही भाजपकडून राज्यसभा देण्यात येणार आहे. तर कोल्हापूर गादीचे छत्रपती संभाजीराजे आधीच राज्यसभेवर आहेत. त्यामुळे भाजपकडून मराठेशाहीचा विस्तार होत असल्याचे चित्र आहे.
राज्यातील मराठा क्रांती मोर्चांनी उठाव घेतल्यानंतर काही दिवसांतच छत्रपती संभाजी राजे यांना राज्यसभेवर घेण्यात आले होते. त्यांची नियुक्ती ही राष्ट्रपतींनी केली होती. त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप सत्तेवर होते. छत्रपती संभाजी राजेंना राज्यसभेवर घेणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जमले नाही ते भाजपने करून दाखवले होते. त्यामुळे मराठा समाजासाठी ही आनंद देणारी बाब ठरली होती.
सातारा गादीचे छत्रपती उदयनराजे भोसले हे गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेतून मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. मात्र त्यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सातारा मतदार संघात फेरनिवडणूक झाली. या निवडणुकीत उदयनराजे यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भाजपवर राज्यात मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. आता भाजपने उदयनराजे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय़ घेतला आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत.
सातारा आणि कोल्हापूर गादीच्या दोन्ही छ्त्रपती व्यतिरिक्त मराठेशाहीचे मातब्बर सरदार घराणे असलेल्या शिंदे घराणेही भाजपमध्ये दाखल झाले आहे. भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभा देण्यात येणार आहे. त्यामुळे मराठेशाहीचे दोन छत्रपती आणि एक सरदार एकाच सभागृहात दिसून येणार आहेत. राज्यसभेत मराठाशाहीचे प्रतिनिधीत्व वाढणार आहे. मात्र मराठेशाहीचा हा विस्तार मागच्या दाराने होतोय एवढच.