आगरी कोळी महोत्सवामध्ये मराठी बाणा
By admin | Published: January 16, 2017 03:01 AM2017-01-16T03:01:33+5:302017-01-16T03:01:33+5:30
आगरी कोळी महोत्सवामध्ये आयोजकांनी या वर्षीही मराठी बाणा जपला आहे.
नवी मुंबई : आगरी कोळी महोत्सवामध्ये आयोजकांनी या वर्षीही मराठी बाणा जपला आहे. कोळी गीतांसह महाराष्ट्रातील लोककला रसिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. महोत्सवाला शहरवासीयांनी प्रचंड गर्दी केली असून १२ दिवसांमध्ये तब्बल ४ लाख नागरिकांनी भेट दिली आहे.
आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्यावतीने नेरूळमधील श्री गणेश रामलीला मैदानामध्ये ४ जानेवारीपासून या महोत्सवाचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातील लोककलांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. नवी मुंबईतील मूळ गावांमधील नागरिकांनी देवी-देवतांची पारंपरिक गाणी सादर केली. गावदेवी मंदिरामध्ये ऐकण्यास मिळणारी ही देवतांची गाणी मंदिराच्या बाहेर फक्त आगरी कोळी महोत्सवामध्येच ऐकायला मिळत आहे. याशिवाय नाचानं रंगलाय कोळीवाडा, आॅर्केस्ट्रा धूमधडाका, लावण्यसंग्राम, सानपाडा येथील जयनाथ पाटील यांच्या एकवीरा आॅर्केस्ट्रा ग्रुप, दिनेश जोशी यांचा रंगमहाल, जागर लोककलेचा, आगरी कोळी जाम भारी या कार्यक्रमांमधून कोळी गीतांसह लावणी, भक्तिगीते व इतर लोकनृत्य सादर करण्यात आली.
आगरी कोळी महोत्सवाने नवी मुंबईतील कलाकारांनाही भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी दिली जात आहे. फक्त सादर करण्यात येणारे गीत मराठी असावे अशी अट घालण्यात आली. मराठी बाणा जपण्याविषयी विचारणा केली असता आयोजकांनी सांगितले की, महोत्सवाला सर्वभाषिक नागरिक येत असतात. या सर्व नागरिकांना आगरी कोळी संस्कृती व महाराष्ट्राच्या लोककलांची ओळख व्हावी यासाठी मराठीचा आग्रह धरण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. पहिल्या दिवसापासून महोत्सवाला नागरिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत रोज २५ ते ३० हजार हजार नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती. संस्थेचे अध्यक्ष नामदेव भगत, रमाकांत म्हात्रे, बाळाराम पाटील, भालचंद्र कोळी, विजय पाटील, विठ्ठल भगत, इंदूमती भगत, गजआनन म्हात्रे, अरविंद जनार्दन भोईर, सुखदेव कृष्णा तांडेल, रामचंद्र म्हात्रे, अमृत पाटील, पुंडलिक पाटील, दिलीप आमले व इतर पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले. खासदार राजन विचारे, विजय नाहटा, मनपाचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह अनेक मान्यवरांनी उत्सवाला भेट दिली. (प्रतिनिधी)