अरबांच्या दुबईत मराठमोळी वारी निघते तेव्हा... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 06:53 PM2018-02-26T18:53:07+5:302018-02-27T13:49:48+5:30

'मराठा तितुका मेळवावा', हे ब्रीद घेऊन यूएईतील मराठीजन महाराष्ट्र धर्म वाढवताहेत. त्यामुळे ही दुबई आमच्यासाठी 'प्रती मुंबई'च होऊन गेलीय.

Marathi Bhasha Din Aashadhi Ekadashi wari in Dubai | अरबांच्या दुबईत मराठमोळी वारी निघते तेव्हा... 

अरबांच्या दुबईत मराठमोळी वारी निघते तेव्हा... 

googlenewsNext

- अशोक चौगुले

सर्वांना सामावून घेणारी महानगरी अशी जगात ख्याती असलेली 'आमची मुंबई' सोडून नोकरीसाठी दुबईत जायचं ठरलं, तेव्हा तिथल्या चालीरितींशी कसं जुळवून घ्यायचं याबद्दल मनात धाकधूक होती. आपण शाकाहारी, विठ्ठलभक्त, भजन-कीर्तनात रमणारे, रोज मंदिरात जाणारे; मग या अरबांच्या देशात आपला निभाव लागेल का, असं सारखं वाटायचं. पण, 'मराठा तितुका मेळवावा', हे ब्रीद घेऊन इथले तमाम मराठीजन महाराष्ट्र धर्म वाढवताहेत. त्यामुळे ही दुबई आमच्यासाठी 'प्रती मुंबई'च होऊन गेलीय, असं आता मी अगदी ठामपणे म्हणू शकतो.  

दुबई एअरपोर्टवर उतरल्यावर मला राहण्याच्या ठिकाणापर्यंत न्यायला आलेला माणूस पाकिस्तानी होता. माझी विचारपूस करत असताना त्याला मी मुंबईचा असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याची गाडी बॉलिवूडच्या रस्त्यावरून जी काही सुस्साट सुटली, ती थांबलीच नाही. बॉलिवूडच्या सगळ्या कलाकारांची नावं सांगून मी त्यांचा कसा चाहता आहे, याचे किस्से तो गाडीत मला सांगत होता. सुरुवातीला कोणीही ओळखीचे नसल्याने त्याच्याशी बऱ्यापैकी मैत्री झाली. ही गोष्ट जेव्हा मी घरच्यांना फोनवरून सांगितली तेव्हा त्यांना चांगलाच 'सांस्कृतिक' (मी पूजापाठ आणि देवभक्त असल्याने) धक्का बसला.

माझी राहण्याची सोय अजमानला करण्यात आली होती. त्यावेळी कोणाशीही ओळख नसल्याने ऑफिस ते घर असाच माझा दिनक्रम असायचा. ऑफिसमध्ये संपूर्ण दिवस कसातरी निघून जायचा, मात्र संध्याकाळची वेळ खायला उठायची.

सहा ते सात दिवसांनी फेसबुकवर दत्तू हा माझा मित्र ऑनलाईन भेटला. त्याच्याशी बोलल्यानंतर कळले की, तोदेखील अजमानमध्येच राहायला होता. त्याच संध्याकाळी दत्तूला भेटलो. त्याने स्वत:च्या घरी नेऊन माझा व्यवस्थित पाहुणचार केला. दुसऱ्याच दिवशी किशोर मुंढे नावाच्या व्यक्तीचा फोन आला. तो दत्तूचा मित्र होता. त्याला संध्याकाळीच भेटलो. ते दिवस गणपतीचे होते. त्यावेळी किशोररावांनी मला, गणपतीच्या आरतीला येता का, असे विचारले. मी लगेचच होकार दिला. पहिल्याच दिवशी आम्ही पाच जणांच्या घरी आरतीसाठी गेलो. किशोरराव माझी प्रत्येक घरी लोकांशी ओळख करून देत होते. मला आपल्या लोकांमध्ये आल्याचं वेगळंच समाधान वाटत होतं. इथला मराठी माणूस एकमेकांशी घट्ट जोडलेला आहे, तो आजही आवर्जून मराठीतच बोलतो. या मराठी बोलण्याच्या सवयीमुळेच मोठमोठ्या मॉलमध्येही अनेक मराठी कुटुंबांशी माझ्या ओळखी झाल्यात.  

एक दिवस किशोररावांनी शारजात श्री गणेश भजन मंडळ असल्याचे सांगितले आणि मी मनोमन 'गणपती बाप्पा मोरssया' अशी आरोळी ठोकली. त्यानंतर यूएई कधीच परकं वाटलं नाही. या भजन मंडळात दर शुक्रवारी भजन व्हायचे. आम्ही सात ते आठ जण नियमाने प्रत्येक शुक्रवारी भजनासाठी एकत्र जमायचो. हे सर्व सुरू असताना आम्हाला दुबई मराठी मंडळाकडून संत तुकाराम बिजेचे आमंत्रण आले. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो. तेथे लहान मुलांची दिंडी आणि कीर्तनाचा सुंदर कार्यक्रम झाला. हे पाहिल्यानंतर आम्ही सर्वांनी मनात एक निश्चय केला की, आपल्या भजन मंडळाचाही एक दिवस असाच कार्यक्रम करायचा. 

काही दिवसांनी आषाढी एकादशी येत असल्याने पंढरपूरला जाण्यासाठी मी सुट्टी टाकून भारतात येणार होतो. घरी जाण्यापूर्वी संभाजी दळवी यांच्या घरी जमलो असताना यंदाची आषाढी एकादशी दुबईतच साजरी करायची हे अचानक ठरले. भजन मंडळ असल्याने भजनाच्या मुख्य कार्यक्रमाला जास्त वेळ आणि दिंडीसाठी पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ राखून ठेवण्यात आला. त्यानुसार कार्यक्रमाची जाहिरात आणि इतर कामांमध्ये सगळ्यांनी स्वत:ला अक्षरश: झोकून दिले. आमचे मंडळ लहान असल्याने आम्ही कार्यक्रमाला फार तर १०० लोक येतील असा अंदाज बांधला होता.

आषाढी एकादशीच्या दिवशी दुपारी सव्वाचार वाजेपर्यंत हॉल संपूर्णपणे भरला होता. मी दिंडीच्यावेळी पहिल्यांदाच हरिपाठाचे नेतृत्त्व करत होतो. मोठ्याने गजर झाला आणि रामकृष्ण हरी म्हणत भजन सुरू झाले. आम्ही त्या तालावर दिंडीत नाचत होतो. संपूर्ण वातावरण विठ्ठलमय होऊन गेले होते. हे सर्व सुरू असताना हॉलमध्ये नजर टाकली तेव्हा संपूर्ण हॉल खच्चून भरला होता. जागा मिळेल त्या कोपऱ्यात लोक फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी उभे होते. आम्हाला एवढ्या प्रतिसादाची अजिबातच अपेक्षा नव्हती. त्यामुळे प्रत्यक्षात दहा ते पंधरा मिनिटे ठरवलेला दिंडीचा कार्यक्रम सव्वातास सुरू राहिला. प्रेक्षकही दिंडीत सामील होऊन फुगड्या घालत होते. सर्वजण मोठ्याने विठुनामाचा गजर करत होते. इतके वर्ष महाराष्ट्रात जे पाहिले होते ते आज दुबईत अनुभवत होतो, यावर विश्वासच बसत नव्हता. कार्यक्रम संपला तेव्हा कळले की हॉलमध्ये तब्बल २५० लोक जमले होते. त्यामुळे आता इतक्या लोकांना जेवायचे कसे द्यायचे हा प्रश्न समोर ठाकला. पण म्हणतात ना, सत्य कर्माचा दाता नारायण. त्यावेळी संदीप पंडित आमच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी कार्यक्रमाला येताना गाडीतून खिचडी आणि फळं आणली होती. त्यामुळे सगळ्यांच्या जेवणाची चिंता दूर झाली. आतापर्यंत भारतातील जवळपास सगळे पंथ दुबईत होते. मात्र, आमच्या या कार्यक्रमाने वारकरी संप्रदायाचा झेंडा दुबईत रोवला. कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येकाने आम्हाला आवर्जुन घरी येण्याचे आमंत्रण दिले. आता दरवर्षी शारजात आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात साजरा होतो.

मराठी भाषा, मराठी संस्कार दुबई, शारजामध्ये किती रुजलेत हे यातून सहज लक्षात येईल. महाराष्ट्राच्या मातीशी नातं सांगणारा इथला मराठी माणूस ही मराठीची पताका अशीच फडकवत ठेवेल, यात शंका नाही. 

Web Title: Marathi Bhasha Din Aashadhi Ekadashi wari in Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.