२७ फेब्रुवारीला का साजरा केला जातो 'मराठी भाषा दिन'?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 10:14 AM2019-02-27T10:14:13+5:302019-02-27T10:23:44+5:30
आज जागतिक मराठी भाषा दिवस साजरा केला जात आहे.
आज जागतिक मराठी भाषा दिवस आहे. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. त्यानिमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. त्यांनी कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन केले.
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मायबोली मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. १९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
कुसुमाग्रजांचा परिचय
२७ फेब्रुवारी १९१२ – पुण्यात येथे जन्म
१९१९- २४ – प्राथमिक शिक्षण – पिंपळगांव बसवंत
१९२४ – २९ – माध्यमिक शिक्षण – नाशिक येथील
१९२९ – बालमृबोधमेवामध्ये लेखन व कविता मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण मुंबई विद्यापीठ
१९३० – हं. प्रा. ठा महाविद्यालयात प्रवेश व रत्नाकर मासिकात कवितांना प्रसिद्धी
१९३२ – काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात सहभाग
१९३३ – धृव मंडळाची स्थापना. नवा मनू मध्ये वृत्तपत्रीय लेखन. जीवन लहरी या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
१९३४ – बी ए परिक्षा उत्तीर्ण (मराठी इंग्रजी)
१९३६ – ३८ – गोदावरी सिनेटोनमध्ये प्रवेश. सती सुलोचना कथालेखन व लक्ष्मणाची भूमिका
१९३८ – ४६ – वृत्तपत्र व्यवसाय. साप्ताहिक प्रभा, दैनिक प्रभात, सारथी, धनुर्धारी, नवयुग इत्यादी. विशाखा काव्यसंग्रह प्रकाशित (१९४२)
१९४४ – विवाह. पत्नीचे नाव मनोरमा
१९४६ – वैष्ण, पहिली कादंबरी, दूरचे दिवे पहिले नाटक
१९४६ – ४८ – साप्तहिक स्वदेश संपादन
१९५० – लोकहितवादी मंडळ स्थापना, संस्थापक सदस्य, शालेय पुस्तकांचे संपादन
१९५६ – अध्यक्षपद मुंबई उपनगर साहित्य
१९५९ – संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सत्याग्रह
१९६४ - अध्यक्षपद ४५ वे मडगाव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिवेशन
१९६४ - जीवनगंगा नाशिक नगर पालिका शतसांवत्सरिक ग्रंथाचे संपादन
१९६६ - राज्य पुरस्कार ययाति आणि देवयानी या नाटकास
१९६७ - राज्य पुरस्कार वीज म्हणाली धरतीला नाटकास
१९६४ - ६७ पुणे विद्यापीठ विधी मंडळावर सदस्य
१९७० - अध्यक्षपद, मराठी नाट्य संमेलन, कोल्हापूर
१९७१ - नटसम्राट नाटकास राज्य पुरस्कार
१९६२ – ७२ अध्यक्ष सार्वजनिक वाचनालय. नाशिक
१९७२ - सौ मनोरमाबाईंचे निधन
१९७४ - नटसम्राट नाटकास साहित्य अकादमी पुरस्कार
१९८५ - अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा राम गणेश गडकरी पुरस्कार
१९८६ - डी लिट पुणे विद्यापीठ
१९८७ - अमृत महोत्सव
१९८८ - संगीत नाट्यलखन अकादमी पुरस्कार
१९८८ - ज्ञानपीठ पुरस्कार
१९८९ - जागतिक मराठी परिषद मुंबई अध्यक्ष
१९९१- पद्मभूषण
१९९६ - कुसुमाग्रज तारा
१० मार्च १९९९ – कुसुमाग्रजांचे निधन
२००३ - पोस्टाचे तिकीट प्रकाशन
मराठी भाषेचा इतिहास
मराठी भाषेचा उदय संस्कृतचा प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेचा महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झ़ाला, असे बहुतांशी मानले जाते. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांचा काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी मधुन लिहिली ज़ाते. इ.स. १२७८ मध्ये म्हाइंभट यांनी लीळा चरित्र लिहिले. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदि ग्रंथांची भर घातली.
शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याच़ा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांचा एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला.