।। सह्याद्रीचा कणा घेऊनि, रुजला महाराष्ट्र-धर्म सिंगापुरी ।।

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 11:22 PM2018-02-26T23:22:00+5:302018-02-27T13:50:26+5:30

सिंगापूरमधला हक्काचा मराठमोळा मित्र परिवार म्हणजे इथलं 'महाराष्ट्र मंडळ' ! मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याची नाळ ही महाराष्ट्राशी नेहमी जुळलेली असते.

Marathi Bhasha Din Maharashtrian Culture in Singapore | ।। सह्याद्रीचा कणा घेऊनि, रुजला महाराष्ट्र-धर्म सिंगापुरी ।।

।। सह्याद्रीचा कणा घेऊनि, रुजला महाराष्ट्र-धर्म सिंगापुरी ।।

googlenewsNext

- स्वप्नील सुधीर लाखे, सिंगापूर 

लहान असताना आजोबांनी पृथ्वी गोलकाची एक मोठ्ठी प्रतिकृती हाती ठेवली आणि मग वेगवेगळी शहरं शोधण्याचा खेळ सुरू झाला. आईने सहजच सांगितलं शोध सिंगापूर कुठंय यात ! एखाद्या शहराचं नाव उच्चारताना जिभेची अन् टाळूची कुस्ती झाली की, ते शहर भारताबाहेरचं नाही, तर भारतातलं अशी एक गाठ ठरलेली असे. त्यामुळे सिंगापूर उत्तर भारतात असावं अशा अंदाजाने तिथे शोधलं. आई खळखळून हसली आणि म्हणाली, 'आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा'. तेव्हा पहिल्यांदा सिंगापूर शोधलं, जगाच्या नकाशावर दक्षिण-पूर्व आशियामधला एक छोटासा 'रेड-डॉट'! 

नोकरीनिमित्त या देशात वास्तव्यास आलो आणि कधी या शहरात विरघळलो हे कळलंच नाही. आल्यावर दुसऱ्याच दिवशी MRT म्हणजे ट्रेनने प्रवास करताना अस्खलित मराठीतून संभाषण ऐकू आलं. परदेशात कोणीच ओळखीचं नसताना तो मराठी आवाज जणू आपलासाच वाटला. त्यानंतर अनेक मराठी बिऱ्हाडं ओळखीची झाली, मित्रांचा गोतावळा, सण-वार, अंगत-पंगत अशी सगळी मस्त मराठमोळी भट्टी जमली. एकदा तर, "स्वप्नील भाऊ तुम्ही धुळ्यांना शे का, मी पाचोऱ्यांना शे ना भो" अशी अस्सल खान्देशी अहिराणी हाक कानी आली आणि क्षणभर एक सुखद धक्काच मिळाला. फेसबुकवरच होम-टाऊन वाचून या पठ्याने काहीही ओळख नसताना हक्काने साद दिली होती ! 

सिंगापूरमधलं वातावरण खूपसं भारतासारखाचं. हवामान, गर्दी, सांस्कृतिक विविधता बऱ्याचदा मुंबईचा भास व्हावा इतकी समानता. खाद्य संस्कृतीच्या बाबतीत तर सिंगापूर स्वर्ग आहे. इथे मलय, चायनीज, थाई, इंडोनेशियन, कोरियन, युरोपियन, जापनीस अशा विविध प्रकारचे पदार्थ मिळतात. पण गंमत म्हणजे भारतीयच नाही तर अगदी मराठमोळे पदार्थ मिसळ, वडापाव, पुरणपोळी, खान्देशी भरीत भाकरी, चमचमीत शेवभाजी, व-हाडी ठेचा, झुणका भाकर, उसाचा रससुद्धा अगदी सहज उपलब्ध आहेत ! इथले पर्यटन स्थळं तर अगदी जगप्रसिद्ध आहेत. मरलायन, सेंटोसा, सिंगापूर झू, बर्ड पार्क, गार्डन बाय द बे, सेंट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्ट या ठिकाणी गर्दीत साधा फेरफटका मारला तरी हमखास मराठी पर्यटक दिसतात. शिस्त आणि स्वच्छतेच्या बाबतीत तर इथले नियम अगदी कडक आहेत.   

सिंगापूरमधला हक्काचा मराठमोळा मित्र परिवार म्हणजे इथलं 'महाराष्ट्र मंडळ' ! मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याची नाळ ही महाराष्ट्राशी नेहमी जुळलेली असते. गुढीपाडवा, दिवाळी पहाट, विविध गुणदर्शनाचं स्नेह संमेलन, मराठी सुगम संगीत मैफील असे जवळजवळ सगळे सण-सोहळे इथे तितक्याच उत्साहात साजरे केले जातात. वाचन संस्कृती जपणारं इथलं मराठी ग्रंथालय हे कादंबऱ्या, नाटकं, कवितासंग्रह, प्रवासवर्णन अशा जवळजवळ ३००० पुस्तकांनी सुसज्ज आहे. सार्वजनिक गणेशोत्सव सुद्धा इथं आपण ५ दिवस दिमाखात साजरा करतो, हे ५ दिवस सगळेच बाप्पांच्या सहवासात मंत्रमुग्ध असतात. वाचन कला जोपासणारा 'जे जे उत्तम' हा कार्यक्रम, 'ऋतुगंध' नावाचं द्वैमासिक असो किंवा वेगवेगळ्या विषयांनी नटलेल्या कवितांचा 'शब्दगंध' हा उपक्रम असो मराठीची मांदियाळी इथे भरभरून साजरी होते. मराठी माणूस आणि नाटक हे नातं तर अगदी घट्ट आहे, सिंगापूरला कामानिमित्त किंवा स्थायिक झालेले नाट्यप्रेमी एकत्र येऊन दरवर्षी एक नाटक सादर करतात, बालनाट्याचे प्रयोगही होतात. तीन-चार महिने नोकरी-काम-घर-शाळा सांभाळून, स्थानिक कलाकार नाटकाची तालीम करून, एक दर्जेदार कलाकृती रंगदेवतेला आणि मायबाप रसिक प्रेक्षकांना अर्पण करतात. आजकाल इथले मराठी सिनेमाचे 'प्रीमिअर' देखील हाऊसफुल्ल असतात. येणाऱ्या पिढीत मराठी संस्कृतीचं बीज रुजावं आणि अमृताशी पैजा घेणारी मराठी त्यांनी सहज आत्मसात करावी म्हणून 'मराठी शाळा' हा उपक्रम मंडळाने सुरू केला तेव्हा पालकांचा आणि सगळ्या बाळ-गोपाळांचा त्याला भरघोस प्रतिसाद मिळला. सिंगापूरचं आकर्षण असणारा आणि स्थानिक संस्कृतीचा उत्सव म्हणजे 'चिंगे परेड', दरवर्षी या परेडमध्ये मराठी संघ आपल्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतो. सिंगापूरला ५० वर्ष झाली तेव्हा सरकारने SG५० सोहळा साजरा केला, त्यात सिंगापूरच्या राष्ट्रपती आणि उपपंतप्रधानांसमोर दिमाखात भगवा ध्वज नाचवत, लेझीम आणि विठू माऊलीच्या गजरात मराठी पथकाने सादर केलेलं नृत्य डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं !  

आज जागतिक मराठी दिनाच्या समस्त वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना इतकंच लिहावंसं वाटतं की, तापी-गोदा-कृष्णेचं तीर्थ हाती घेतलेला, सह्याद्रीचा कणा घेऊन जगाच्या नकाशावर सिंगापूर नावाच्या इवल्याशा लाल ठिपक्यावर स्वतःच स्थान निर्माण करणाऱ्या मराठी माणसाच्या मनात नेहमी एकच भाव असतो:

नाचला डोलला, इथे फडकला जरीपटका अंबरी ...
वंश शिवबाचा नांदला गर्जला, सन्मानाने सिंगापुरी !

भंडारा माळूनी मस्तकी, घेतले गोदा-कृष्णेचे तीर्थ करी ... 
सह्याद्रीचा कणा घेऊनि, रुजला महाराष्ट्र-धर्म सिंगापुरी !

ढोल ताशा आणि लेझीम, उत्सव चाले या मंदिरी ... 
पांडुरंग-हरी गजरात रंगली, नगरी माझी सिंगापुरी !

मराठमोळे संस्कार नमिती, तुजला भारतभू परि ... 
उदरभरण नव्हे ग फक्त, माउली समान तू सिंगापुरी ! 

(लेखक गेली सहा वर्षं सिंगापूरमध्ये वास्तव्यास असून आयटी सिस्टीम आर्किटेक्ट म्हणून काम करतात.)

Web Title: Marathi Bhasha Din Maharashtrian Culture in Singapore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.