Marathi Bhasha Din: मराठमोळं मॉरिशस; पाचूच्या बेटावर दीडशे वर्षं फडकतेय भगवी पताका!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 08:24 AM2018-02-27T08:24:24+5:302018-02-27T12:36:07+5:30
मराठी वंशाचे मजूर जेव्हा मॉरिशसमध्ये आले तेव्हा मराठी संस्कृती आणि भाषा या दोन अमूल्य गोष्टींशिवाय त्यांच्याकडे काहीच नव्हते आणि त्यांनी हा खजिना इतका बहुमोलपणे जपून ठेवला की, आज आम्ही सातासमुद्रापलीकडे असूनही महाराष्ट्रापासून दूर आहोत असे वाटतच नाही.
शिरीष रामा
स्वच्छ समुद्रकिनारे आणि स्वर्गीय निसर्गसौंदर्य लाभलेले मॉरिशस हे बेट म्हणजे हिंद महासागरातील आफ्रिका खंडाजवळ असलेला देश आहे. या देशाला वेगवेगळ्या जाती-जमातींमधील सामाजिक सौंदर्यामुळे चांगले स्थैर्य लाभले आहे. येथे सुमारे ६५% लोकसंख्या भारतीय वंशाची आहे. मॉरिशस ब्रिटिशांच्या ताब्यात होतं, तेव्हा तेथे राबण्यासाठी त्यांनी दीडेकशे वर्षांपूर्वी भारतातील विविध प्रांतातून काही मजूर नेले होते. बिहार, तमीळनाडू आणि महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र-कोकण परिसरातील अनेक जणांना तेव्हा बळजबरी तिथे नेण्यात आलं होतं.
मराठी वंशाचे मजूर जेव्हा मॉरिशसमध्ये आले तेव्हा मराठी संस्कृती आणि भाषा या दोन अमूल्य गोष्टींशिवाय त्यांच्याकडे काहीच नव्हते आणि त्यांनी हा खजिना इतका बहुमोलपणे जपून ठेवला की, आज आम्ही सातासमुद्रापलीकडे असूनही महाराष्ट्रापासून दूर आहोत असे वाटतच नाही.
वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाद्वारे मराठी संस्कृती आणि भाषा अजूनही जपली जात आहे. १८व्या शतकात महाराष्ट्रातून मॉरिशसमध्ये स्थलांतरित झालेल्या मजुरांनी जागरण, गोंधळ, संकष्ट चतुर्थी, सत्यनारायणाची कथा, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी या पूजांद्वारे आणि सणांद्वारे आपली संस्कृती टिकवली आहे. आज प्रत्येक गावातल्या मराठी संस्थांमध्ये या सर्व पूजा आणि सण अजूनही मोठ्या उत्साहाने साजरा केले जाते आणि त्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक भजनी मंडळांची स्थापनाही झाली आहे.
या पाचूच्या बेटात मराठी लोकांची वैशिष्ट्य म्हणजे जाखडी नृत्य. गणेशोत्सवात भजन, कीर्तन, नृत्य यासोबतच 'जाखडी' नावाचे पुरातन नृत्य सादर केले जाते. ढोलकीच्या तालावर नाचत-गात, गणपतीच्या आगमनाची वर्दी देणारे हे नृत्य आहे. गेली दोन शतके दशकानुदशके लोकप्रिय आहे. या नृत्याचे मूळ कोकणात रत्नागिरी परिसरात असल्याचे अभ्यासक सांगतात.
मॉरिशसची मातृभाषा क्रियोल असली तरीही दोन मराठी माणसं भेटली की त्यांच्या मुखातून निघणारा पहिला शब्द म्हणजे 'नमस्कार'. मंगळसूत्र, कुंकू, जोडवी असे दागिने सौभाग्याचे प्रतीक मानण्याची संकल्पना अजूनही स्त्रियांमध्ये आहे. इथे नऊवारी साडी इतकी प्रसिद्ध आहे की गणेश चतुर्थीच्या वेळी मराठी स्त्रियांसोबत अमराठी स्त्रियाही नऊवारी साडी नेसतात.
मॉरिशसमध्ये मूळ मराठी वंशाच्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यामध्ये सरकारही भरीव योगदान देते. शैक्षणिक क्षेत्रात पहिली ते नववीच्या मुलांना मराठी किंवा इतर भारतीय भाषा शिकणे अनिवार्य आहे. प्रत्येक शाळेत एक मराठी शिक्षक उपलब्ध व्हावा यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. मराठी शिकणाऱ्या मुलांची संख्या कमी होत असली तरी एक शिक्षक असावाच लागतो. तसेच दर शनिवारी आणि रविवारी मराठा मंदिर आणि मराठी साहित्य परिषद या दोन संस्था वेगवेगळ्या गावात आणि शहरातल्या आपल्या शाखेत मुलांना मोफत शिकवणी देतात. इतकेच नव्हे, तर दरवर्षी मराठीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकारकडून (इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सची) शिष्यवृत्ती मिळते. या मुलांना पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये मराठीतून बी.ए करण्याची संधी मिळते.
मॉरिशसमध्ये मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी महात्मा गांधी संस्था, मराठी साहित्य परिषद, मराठा मंदिर, मॉरिशस मराठी भाषक संघ, मराठी सांस्कृतिक केंद्र, मॉरिशस मराठी महामंडळ इत्यादी अनेक संस्था कार्यरत आहेत. वेगवेगळ्या स्पर्धा आणि कार्यक्रमांद्वारे तरुण पिढीला मराठी भाषा आणि संस्कृतीशी एकरूप करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने चालू असतो. तसेच कला आणि संस्कृती मंत्रालयाद्वारे दरवर्षी मराठी नाट्यस्पर्धा आयोजित केली जाते.
मॉरिशसमध्ये मराठी संस्कृती आणि भाषा टिकवण्याच्या या महान कार्यात मी हातभार लावत आहे याचे मला खूप कौतुक वाटते. सध्या मी महात्मा गांधी संस्थेत सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मराठी शिकवतो. मुलांचे मराठी भाषा शिकणे म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञानापुरतेच न राहता त्यांना मराठी संस्कृती आणि परंपराही शिकवली जाते. मराठी भाषा शिकविण्याखेरीज दरवर्षी मी माझ्या गावातल्या मराठी संस्थेच्या मुलांबरोबर मराठी नाटकात भाग घेतो. नाटकाद्वारे मुले मराठी भाषेच्या जवळ येतात. याप्रमाणे माझ्या पूर्वजांची ही भाषा टिकविण्याची माझी अविरत धडपड चालू असते.
(शिरीष मॉरिशसमध्ये मराठी शिकवतो, त्याने भारतात राहून पुणे विद्यापीठातून बी. ए आणि एम.एससी संवादशास्त्र या पदव्यांचे शिक्षण घेतले आहे.)