तात्या, तुम्ही ‘गांधी’ विचारांची गरज यावर काहीतरी लिहा..!
By अतुल कुलकर्णी | Published: February 27, 2022 10:01 AM2022-02-27T10:01:06+5:302022-02-27T10:01:56+5:30
तुम्ही लिहिलेल्या ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ ही कविता आम्ही सतत वाचत आलोय.
अतुल कुलकर्णी
आदरणीय कुसुमाग्रज, ऊर्फ आमचे तात्या,
नमस्कार.
तुम्ही लिहिलेल्या ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ ही कविता आम्ही सतत वाचत आलोय. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर ती लिहून ठेवली होती. हल्ली ती तेथे दिसत नाही. कदाचित त्याची गरज उरली नसेल. पण आम्ही तुमची ती कविता आत्मसात केलीय. त्यानुसारच आम्ही वागतो. तुमच्या कवितेतील ओळींचा आधार घेऊन ते पटवून देऊ शकतो म्हणजे आम्ही तुमच्या कवितांनी कसे सुधारलो हेही तुमच्या लक्षात येईल.
पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका।
असं तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात. आम्ही हल्ली आमच्या आई-वडिलांना अभिवादन करत नाही तर स्वातंत्र्यदेवीला करायचा कुठे प्रश्न येतो. तेव्हा तुम्ही ती अपेक्षाही ठेवू नका... सुरुवातीलाच स्पष्ट केलेलं बरं...
वेतन खाऊन काम
टाळणे हा देशाचा द्रोह असे।
करतिल दुसरे, बघतिल
तिसरे असे सांगुनी सुटू नका।।
तुम्ही हे जे सांगितले ते आम्ही तंतोतंत पाळत आलोय. आम्ही वेतनाला हातच लावत नाही. अनेकदा तर बँकेत जमा झालेल्या वेतनाला हात लावण्याचीही गरज पडत नाही. सगळं वरच्यावर भागून जातं. ‘करतिल दुसरे’, असेही आम्ही म्हणत नाही. आम्ही जे करायचं ते बरोबर करतो. त्यासाठी जे ‘घ्यायचं’ ते स्पष्ट बोलून घेतो आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे कोणाला सांगत सुटत नाही आम्ही...
बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ
गोडवे गाऊ नका।
आम्ही आता पुतळ्यांभोवती कायमचे सुरक्षारक्षक ठेवले आहेत. कधी कधी आमच्यातल्या कोणाला राजकीय फायदा लाटायचा असेल तर तो ती व्यवस्था दुसरीकडे कशी जाईल हे पाहतो. मग काही ठिकाणी दंगल होते, दगडफेक होेते... पण हे सगळं कोणी केलं हे आम्ही कोणालाही सांगत नाही... त्यामुळे त्याचे गोडवे गाण्याचा तर प्रश्नच येत नाही कधी...
भाषा मरता देशही मरतो,
संस्कृतिचाही दिवा विझे।
गुलाम भाषिक होऊनि
अपुल्या प्रगतिचे शिर कापू नका।।
ही ओळ तर आता तुम्हाला कधी लिहायची वेळच येणार नाही तात्या. गेले काही दिवस आम्ही मराठी भाषेत एवढ्या नवनवीन शब्दांची भर टाकली आहे की त्याचाच नवा शब्दकोष करावा लागेल. ‘भाषा मेली की देश मरतो’ हो तुमचा संदेश आम्ही एवढा मनावर घेतलाय की गेले काही दिवस आमच्या अनेक नेत्यांनी भ ची, म ची बाराखडी नव्याने लिहायला घेतली आहे. शिव्या शापांचा ग्रंथही करता येतोय का याचेही प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे त्याची आता चिंताच राहिली नाही.
स्वच्छ साधना करा
धनाची बैरागीपण नसे बरे।
सदन आपुले करा सुशोभित
दुसऱ्याचे पण जाळू नका।।
जे धन घेतो ते ‘स्वच्छ’ करुन घेण्याचेही मार्ग आम्ही शोधले आहेत. बाजारात हल्ली नवनवीन ‘वॉशिंग मशीन’ पण आल्या आहेत. त्यात गेलं की सगळं स्वच्छ होऊन जातं... त्यामुळे जाळपोळीची गरज उरली नाही तात्या. सध्या तरी आम्ही फक्त आमचं सदन कसं सुशोभित करता येईल ते पाहतोय. त्याला सोन्याची माडी कशी करायची हा एकमेव ध्यास आम्ही... एकदा का आमचं झालं की दुसऱ्याचं आपोआप भिकार दिसणार... मग ते जाळायची गरज काय उरणार...? त्यामुळे आता आम्हाला तुमच्या कवितांची तशी फार गरज उरलेली नाही.
काही जण म्हणतात की, जीवनाचं सार सांगणारी बहिणाबाई आम्हाला आतून हलवून टाकत नाही... ज्ञानदेव, तुकारामांचे अभंग आम्हाला आजच्या जगण्याशी संयुक्तिक वाटत नाहीत... तुमच्या कविता जगण्याची प्रेरणा आहेत हे खरं वाटत नाही... पण या गोष्टींना आताच्या जमान्यात काही अर्थ उरलेला नाही. मराठी साहित्यापेक्षा ‘गांधी’चे फोटो छापलेल्या साहित्यावर श्रद्धा ठेवायला पाहिजे. तुमची ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ ही कविता जुनी झाली. आता तुम्ही ‘गांधी’ विचारांची गरज यावर काहीतर लिहा...
तुमचाच, बाबुराव