मराठी विषय घेऊन का होत नाही संशोधन?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 11:34 AM2022-02-27T11:34:14+5:302022-02-27T11:35:58+5:30
मराठी विषयात संशोधन (पीएच.डी.) करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली असली तरी इतर विषयांतील संशोधनासाठी मराठीचा वापर फारसा होताना दिसत नाही.
सुहास शेलार
मराठी विषयात संशोधन (पीएच.डी.) करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली असली तरी इतर विषयांतील संशोधनासाठी मराठीचा वापर फारसा होताना दिसत नाही. विद्यार्थ्यांचा इंग्रजीकडील कल आणि बहुतांश विद्यापीठांतील अध्यापनाचे माध्यम हे दोन घटक त्यास मुख्यत्वे जबाबदार असल्याचे मत पीएच.डी.च्या मार्गदर्शकांनी व्यक्त केले.
याविषयी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. वंदना महाजन म्हणाल्या की, मराठी विषयात संशोधन करणाऱ्यांची संख्या अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुंबई विद्यापीठात तर ही संख्या १३०हून अधिक आहे. पण इतर विषयांच्या बाबतीत तसे चित्र दिसत नाही. मुंबई-पुणेसारख्या विद्यापीठांत मराठी वगळता अन्य विषयांचे अध्यापन इंग्रजीतून केले जाते. त्यामुळे तयार होणारे प्रबंध हे बहुतांश इंग्रजीतूनच असतात. मुंबई विद्यापीठाने २०१८ साली ‘इतिहास आणि मराठी भाषा’ हा नवा पेपर सुरू केला. इतिहास विषयातील या संशोधन पत्रिकेचा अभ्यास ४० टक्के विद्यार्थी मराठीतून करीत आहेत. अशाप्रकारचे प्रयत्न केल्यास संशोधकांची संख्या वाढेल, असे मत इतिहास विषयाचे मार्गदर्शक डॉ. नारायण भोसले यांनी व्यक्त केले.
संदर्भ साहित्य, प्राेत्साहनही गरजेचे!
मराठीत संशोधनासाठी जे जे संदर्भ लागतात ते मराठीत उपलब्ध आहेत. सामाजिक शास्त्रांसह इतर विषयांतील बरेचसे ज्ञान हे मराठीत उपलब्ध आहे. संशोधनात एकाच भाषेतले संदर्भ वापरून चालत नाहीत. मराठीत प्रबंध लिहायचा असेल तर हिंदी, इंग्रजीतील संदर्भ वापरता येतात. त्यामुळे संशोधन साहित्य उपलब्ध नसल्यामुळे मराठीत संशोधन होत नाही. - डॉ. वंदना महाजन, मराठी विभागप्रमुख, मुंबई विद्यापीठ
काही विद्यार्थ्यांना मराठीत प्रबंध करायचा असतो; पण त्यांच्या शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असल्याने लेखनात अडथळे येतात. त्यामुळे ते मराठीत अभ्यास करतात आणि प्रबंध इंग्रजीत लिहितात. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यास संशोधनातील मराठीचा वापर वाढवता येईल. - डॉ. नारायण भोसले, इतिहास संशोधनाचे मार्गदर्शक
गेल्या काही वर्षांत संशोधनापलीकडे मराठी भाषेची ज्ञान व्यवहार्यता वाढली आहे. मराठीतील मूळचे ज्ञान, साहित्यविचार जगभरातील इतर भाषांत पोहोचले आहेत. म्हणजे, महात्मा फुलेंनी आपले विचार मराठी भाषेत मांडले, त्यावर संशोधन होऊन ते जगभरात पोहोचले. त्यामुळे गेल ऑम्वेट यांच्यासारखे जगभरातील साहित्यिक मराठीकडे वळले आहेत. ही महत्त्वाची बाब आहे. - डॉ. अनिल सपकाळ, मराठी संशोधनाचे मार्गदर्शक