मराठी ग्राहक देशात सर्वाधिक जागरूक

By admin | Published: March 17, 2017 03:31 AM2017-03-17T03:31:26+5:302017-03-17T03:31:26+5:30

पुण्यात पाया घातलेल्या ग्राहक हक्क चळवळीचा वृक्ष आता देशभर वाढला असला तरी अजूनही महाराष्ट्रातील ग्राहक सर्वाधिक जागरूक असल्याचे दिसून येत आहे़

Marathi consumers are most conscious in the country | मराठी ग्राहक देशात सर्वाधिक जागरूक

मराठी ग्राहक देशात सर्वाधिक जागरूक

Next

पुणे : पुण्यात पाया घातलेल्या ग्राहक हक्क चळवळीचा वृक्ष आता देशभर वाढला असला तरी अजूनही महाराष्ट्रातील ग्राहक सर्वाधिक जागरूक असल्याचे दिसून येत आहे़ नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाइनला केल्या जाणाऱ्या तक्रारीमध्ये सर्वाधिक तक्रारी या महाराष्ट्रातून येत असल्याचे दिसते़
ग्राहकांना त्यांनी खरेदी केलेल्या विविध वस्तू तसेच सेवांमध्ये त्रुटी आढळल्यास त्याची तक्रार करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाइन तयार केली आहे़ या हेल्पलाइनवर सर्वाधिक १३़९० टक्के तक्रारी या महाराष्ट्रातून आल्या. त्याखालोखाल उत्तर प्रदेश (१३़४८), दिल्ली (१२़२१), मध्य प्रदेश (८़०६), राजस्थान (७़५५) यांचा नंबर लागतो़
जानेवारी २०१७ मध्ये या हेल्पलाइनवर ४३ हजार ४ कॉल आले़ त्यातील ४ हजार ३५१ कॉल महाराष्ट्रातून आले होते़ उत्तर प्रदेशातून ४ हजार २१९, दिल्ली ३ हजार ८२३, मध्य प्रदेश २ हजार ५२२, राजस्थान २ हजार ३६२, पश्चिम बंगाल १ हजार ९६७, हरियाणा १ हजार ७३३, गुजरात १ हजार ६६७, कर्नाटक १ हजार ५८१ आणि बिहार १ हजार ४७८ कॉल आले होते़ यात प्रामुख्याने सर्वाधिक तक्रारी या ई-कॉमर्स (२१ टक्के), टेलिकॉम (११ टक्के), बँकिंग (९ टक्के), इलेक्ट्रॉनिक्स वस्तू (८ टक्के), एजन्सी सर्व्हिस (३ टक्के) यांचा समावेश होता़
नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाइनला डिसेंबर २०१६ या महिनाभरात तब्बल १ लाख ७६ हजार २१७ जणांनी भेट दिली़ डिसेंबरमध्ये या हेल्पलाइनवर ३८ हजार ८०४ कॉल आले होते़ त्यापैकी सर्वाधिक तक्रारी महाराष्ट्रातून ४ हजार २२२ (१४़४७ टक्के) आल्या होत्या़
या तक्रारीमध्ये प्रामुख्याने ई-कॉमर्स क्षेत्रात पैसे भरले पण ते रिफंड मिळाले नाहीत़ टेलिकॉममध्ये असमाधानकारक सेवा, ग्राहकोपयोगी वस्तूमध्ये उशिरा मिळणारी सेवा, बँकिंग क्षेत्राकडून एटीएममधून पैसे मिळाले नाहीत पण, खात्यातून पैसे कापले गेले याविषयी प्रामुख्याने तक्रारी दिसून येतात़ (प्रतिनिधी)

Web Title: Marathi consumers are most conscious in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.