मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावरुन मराठी गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 06:27 PM2019-11-11T18:27:00+5:302019-11-11T18:28:01+5:30
त्रैभाषिक वापराला विराम; इंग्रजी, हिंदी भाषेला रेल्वेची पसंती
अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा वापर होत नसल्याची बाब समोर आली आहे. ‘मध्य रेल्वे डॉट कॉम’ हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असले तरी यावर इंग्रजी, हिंदी भाषेचाच वापर होत असल्याचे वास्तव आहे.
मध्य रेल्वेची इत्थंभूत माहिती देणारे ‘सीआर डॉट इंडियन रेल्वेज डॉट जीओव्ही डॉट इन’ हे संकेतस्थळ आहे. मात्र, हे संकेतस्थळ सुरू केल्यानंतर इंग्रजी, हिंदी भाषेचाच वापर करावा लागतो, तसे पर्याय देण्यात आले आहे. मध्य रेल्वे विभागाने त्रैभाषिक वापराला पूर्णविराम दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर असा पाच विभागाचा कारभार मध्य रेल्वे विभागात चालत असताना मराठी भाषेचे रेल्वे विभागाला वावडे असल्याचे दिसून येते. संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर इंग्रजी भाषेचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांसाठी मध्य रेल्वे विभागाने संकेतस्थळावर मराठी पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मराठी प्रवाशांकडून होत आहे. राज्यात १२ कोटी लोकसंख्या असून, यात बहुतांश मराठी भाषिक आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने संकेतस्थळावर मराठी भाषेचा वापर सुरू करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा वापर करता यावा, यासाठी प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करण्यात येईल. लवकरच याबाबतचे पत्र मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांना पाठवू. मराठी भाषिक प्रवाशांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल.
- नवनीत रवि राणा, खासदार, अमरावती