इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठीचा जागर

By admin | Published: February 28, 2017 02:58 AM2017-02-28T02:58:29+5:302017-02-28T02:58:29+5:30

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून साहित्य जल्लोष प्रतिष्ठानतर्फे वसईतील इंग्रजी व बहुभाषिक शाळांमध्ये आज खऱ्या अर्थाने मराठीचा जागर करण्यात आला.

Marathi Jagar in English medium schools | इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठीचा जागर

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठीचा जागर

Next


वसई : जागतीक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून साहित्य जल्लोष प्रतिष्ठानतर्फे वसईतील इंग्रजी व बहुभाषिक शाळांमध्ये आज खऱ्या अर्थाने मराठीचा जागर करण्यात आला. यावेळी साहित्यिक , पत्रकार , कवी ,यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांची महती वर्णन करून मातृभाषा असलेल्या मराठीचा जागर वेगवेगळ्या शाळांमध्ये केला. त्याचबरोबर वसईत इतर अनेक ठिकाणीही मराठी भाषा दिन विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
वसईतील साहित्य जल्लोष प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष पु. द. कोडोलीकर यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच वसई तालुक्यातील इंग्रजी माध्यमे व बहुभाषिक शाळांतील १२ शाळांमध्ये मराठीचा जागर करण्यात आला . वेगवेगळ्या ठिकाणी साजरा झालेल्या कार्यक्रमामध्ये साहित्यिक तुलसी बेहेरे, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, डॉ. पल्लवी बनसोडे , डॉ भारती देशमुख , रेखा बेहेरे ,सुरेखा धनावडे , शैला आचार्य ,संदीप पंडित,रमाकांत वाघचौडे , महादेव वीरकर , हरिहर बाब्रेकर , स्वाती जयकर, सुरेखा कुरकुरे , केवल वर्तक ,सुरेश ठाकूर , शांताराम वाळींजकर , दत्तात्रय देशमुख , संदेश जाधव , प्रकाश वनमाळी, अशोक मुळे , जयंत देसले व विजय राऊत यांनी विद्यार्थ्यांना मराठीची महती सांगितली . वसई तालुक्यात आजही इंग्रजी माध्यमे अथवा बहुभाषिक शाळांत मराठीचे वातावरण असून त्यात आज झालेल्या या कार्यक्रमामुळे भर पडली आहे. सेंट झेवियर हायस्कूल नायगाव , सेंट फ्रान्सिस झेविअर हायस्कूल नायगाव , बीकेएस हायस्कूल, माणिकपूर, शहा मुलजी भाई कल्याणजी हायस्कूल (गुजराती ), सेंट झेवियर हायस्कूल माणिकपूर, सेंट बिलीब्रॉटस हायस्कूल तुळींज , जुलेखा बेगम बालुमिया झकेरीया इंग्लिश हायस्कूल नालासोपारा , कै.कृ . मो. पाटील देशमुख विद्यालय , तुळींज , मातोश्री मोतीबाई नानालाल दुग्गड, गुजराती शाळा , विरार , मुळजीभार्इं मेहता इंटरनॅशनल स्कूल ,विरार , हुजेफा उर्दू हायस्कूल कोळीवाडा वसई व सोपारा इंग्लिश स्कूल या शाळा सहभागी झाल्या होत्या. यावेळी विविध शाळांतील मुलांनी मराठी नाटके, कविता सादर केल्या.
मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला, अर्थात रविवारी संध्याकाळी वाघोली येथील शनी मंदिर सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कवी रामदास फुटाणे, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, बबन नाईक यांच्यासह अनेक साहित्यिक यावेळी हजर होते. विवा महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे ग्रंथदिंडीचे आयोजन आज करण्यात आले होते. नवीन महाविद्यालयाच्या प्रांगणातून निघालेल्या या ग्रंथदिंडीत भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, बायबल, कुराण आणि कुसुमाग्रजांचे नटसम्राट यांचा समावेश करून सर्वधर्मसमभावाचा एक आगळा वेगळा आदर्श घालून देण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविकिरण भगत यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर जुन्या महाविद्यालयाच्या दिशेनें ही दिंंडी रवाना झाली. पारंपरिक वेशभूषा केलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिंनीच्या बरोबरीनें महाविद्यालयाचे प्राचार्य, लेझीम पथक आणि शिक्षकवर्गही या दिंंडीत सहभागी झाले होते. याशिवाय कुसुमाग्रजांच्या साहित्यकृतींचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले.
विवा महाविद्यालयाच्या ग्रंथालयातर्फेही मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने तीन दिवसीय ग्रंथप्रदर्शनाचें आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटनही प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथालयातर्फे विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांंच्यासाठी घेण्यात आलेल्या मराठी हस्ताक्षर स्पर्धेच्या विजेत्यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर करणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
नि:संकोचपणे मराठी भाषा बोलल्याने मराठी बोलणारी इतर माणसें आपल्या जवळ येतात. व आपल्यालाच त्याचा फायदा होतो’ असे प्रतिपादन प्रा चंद्रकांत पवार ह्यांनी मराठी भाषा दिनानिमित्त जीवन विकास मंडळ, निर्मळ येथील कार्यक्रमात केले.
नुकत्याच डोंबिवली येथे पार पडलेल्या ’९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनात’, बोलीभाषा काव्यसंमेलनात, ’कादोडी’ ह्या बोलीभाषेत कविता सादर करणाऱ्या स्थानिक कुपारी कवींचे ख्रिस्तोफर रिबेलो ह्यांनी स्वागत केले. इग्नेशियस डायस, फेलिक्स डिसोजा, सचिन मेंडीस, सँबी परेरा, बर्नर्ड लोपीस, राजन डिमेलो व मेल्सिना तुस्कानो या कवींनीही आपापल्या कलाकृती सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. जीवन विकास मडळ संचालित’ चेतना पुस्तकालयामधील ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांचा त्यांच्या योगदानाबद्दल सत्कारही करण्यात आला.(वार्ताहर)
>हा तर मराठीबाबतचा न्यूनगंडच आहे!
शुद्ध मराठी भाषा बोलणे हे आज काल खूपच कमी कमी होत चालले आहे. ह्याला जबाबदार आपणच आहोत. जगभरात विविध कॉलेजेसमध्ये मराठीचा एक फॉरेन भाषा म्हणून अभ्यास होत असतांना आपण मराठी भाषिकांमध्ये मराठीविषयी एवढी उदासीनता का? मराठ्यांचे राज्य कितीतरी दूरदूरवर पोहोचले होते. राणी लक्ष्मीबाई ह्यांचे ऐतिहासिक’ मी माझी झाशी देणार नाही’ हे उद्गार त्यांनी मराठीत काढले होते. आपण मात्र मराठीमध्येही’ मै मेरी झांसी नाही दूंगी’ असे हिंंदीमध्येच लिहितो . हा आपल्यामधील मराठीविषयी एक न्यूनगंडच आहे, असे परखड मत चंद्रकांत पवार यांनी यावेळी बोलताना माडले. उपस्थित श्रोत्यांकडून २० वेगवेगळे शब्द गोळा करून त्यांनी उत्स्फूर्तपणे तयार केलेल्या मराठी कवितेला उपस्थितांनी खूप दाद दिली. त्यांच्या पत्नी प्रा. मालिनी पवार ह्यांनीही कुसुमाग्रजांच्या साहित्याचा आढावा घेतला.

Web Title: Marathi Jagar in English medium schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.