मराठी भाषा अभिजातच; प्रमाणपत्राची गरज नाही; प्राचार्य डॉ. कौतिकराव ठाले यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 07:45 AM2022-03-30T07:45:51+5:302022-03-30T07:46:12+5:30
मुकुंदराज, महदंबा, संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ या सर्वांनी सर्वोत्तम काव्यच नव्हे, तर नवे मूल्य, जाणिवा दिल्या. मराठवाड्यातील याच लेखक, कवी, विचारवंतांनी महाराष्ट्राच्या वाङ्मयाचा इतिहास समृद्ध केला, असेही ठाले-पाटील यावेळी म्हणाले.
नांदेड : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळेल ठाऊक नाही; पण मराठी भाषा ही अभिजात आहेच. तिला कुणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कौतिकराव ठाले-पाटील यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘मराठवाड्यातील लेखन’ या विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, तर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, संकुलाच्या संचालिका डॉ. शैलजा वाडीकर, डॉ. अच्युत बन, उपजिल्हाधिकारी विकास माने, स्नेहलता स्वामी, संयोजक डॉ. पृथ्वीराज तौर आदी उपस्थित होते.
मराठी वाङ्मयाच्या आठशे वर्षांच्या इतिहासातील सुरुवातीची चारशे वर्षे मराठवाड्यातच साहित्यनिर्मिती झाली. मुकुंदराज, महदंबा, संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ या सर्वांनी सर्वोत्तम काव्यच नव्हे, तर नवे मूल्य, जाणिवा दिल्या. मराठवाड्यातील याच लेखक, कवी, विचारवंतांनी महाराष्ट्राच्या वाङ्मयाचा इतिहास समृद्ध केला, असेही ठाले-पाटील यावेळी म्हणाले.
यावेळी प्रो. हिरायान्ना यांच्या ‘कलानुभव’ या पुस्तकाचे डॉ. शैलजा वाडीकर यांनी भाषांतर केलेले पुस्तक, डॉ. अच्युत बन लिखित ‘माझ्या आयुष्याची स्मरणगाथा’, स्नेहलता स्वामी लिखित कादंबरी ‘गांधारी’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.