मराठी वाङ्मयाला परंपरा नाही- श्याम मनोहर; अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 05:54 AM2018-02-18T05:54:08+5:302018-02-18T05:54:19+5:30
‘‘नीट जगणे आणि अनेक प्रकारचे कुतूहल या माणसाच्या दोन मूलभूत प्रेरणा आहेत. सभ्यतेचा संदर्भ जगण्याशी आणि संस्कृतीचा संदर्भ शोधण्याशी असतो. संस्कृतीचे वाङ्मय अभिजात आणि कालातीत असते. अभिजात मराठी वाङ्मयाला इतिहास आहे; परंतु परंपरा नाही,’’ अशी खंत ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी व्यक्त केली.
महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा) :
‘‘नीट जगणे आणि अनेक प्रकारचे कुतूहल या माणसाच्या दोन मूलभूत प्रेरणा आहेत. सभ्यतेचा संदर्भ जगण्याशी आणि संस्कृतीचा संदर्भ शोधण्याशी असतो. संस्कृतीचे वाङ्मय अभिजात आणि कालातीत असते. अभिजात मराठी वाङ्मयाला इतिहास आहे; परंतु परंपरा नाही,’’ अशी खंत ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी व्यक्त केली.
‘‘आपल्या देशात सुंदर, प्रशस्त, मोफत, सुसज्ज आणि जावेसे वाटेल अशी वाचनालये असावीत. सर्व राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये समृद्ध वाचनालयांचा मुद्दा समाविष्ट करावा आणि तो पूर्ण करावा. आपला देश वाचनालयांचा व्हायला हवा. शेतकरी, लेखक आपल्या कामातून जगतील, अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही,’’ हेही त्यांनी अधोरेखित केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे श्याम मनोहर यांचा सत्कार करण्यात आला. गंगाधर पानतवणे प्रकृती-अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. या वेळी गुर्जर साहित्यिक सीतांशू यश्चचंद्र, महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, चित्रा मनोहर आदी उपस्थित होते.
मनोहर म्हणाले, ‘‘साहित्यात आपल्याला संस्कृतीपर्यंत पोहोचायचे आहे. तत्त्व जाणून पुढे जायचे आहे. गहन प्रश्न आणि उत्तर मिळविण्याचे प्रयत्न हे संस्कृतीचे लक्षण आहे. जगणे प्रसंगांनी बनलेले असते आणि एखाद्या प्रसंगातून जीवनाचा अर्थ निघतो. जगण्यात सभ्यता आणली आणि सभ्यतेत एक कोपरा ज्ञानासाठी जिवंत ठेवला पाहिजे. असे केल्यास जगण्यातले विकार किमान उफाळून येणार नाहीत.’’
श्रीपाद जोशी म्हणाले, ‘‘मराठीबरोबरच विज्ञानही अभ्यासक्रमात अत्यावश्यक करणे गरजेचे आहे, हे श्याम मनोहर यांच्याकडे पाहून पटते. भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये सुसूत्रतेला सर्वाधिक महत्त्व आहे. आपण सर्व भारतीयतेच्या नावाखाली अभारतीय झालो आहोत. मात्र, ज्ञान, बुद्धीची जाणीव करून देणारा श्याम मनोहर हा एकमेव नाटककार आहे. आजकाल प्रश्न पडणारे, भूमिका घेणारे लेखक दुर्मिळ झाले आहेत. अशा वेळी परखड भूमिका घेणारे लेखक महत्त्वाचे ठरतात.’’
अरुणा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. इंद्रजित घोडके यांनी आभार मानले.
जिंकण्याचा हट्ट नको...
‘‘साहित्य, कथा, कविता ही ज्ञानक्षेत्रे आहेत. गणितज्ञ, इतिहासकार, कलावंत, लेखक कसे असतात, कसे काम करतात, त्यांचे मन आणि बुद्धी कशी असते, हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? असा सवाल करीत मनोहर म्हणाले, ‘‘राजकारण, डावे-उजवे होऊ द्या; मात्र ज्ञानाची चर्चा होते का, हा खरा प्रश्न आहे. ज्ञान केवळ मिळवायचे नसते, तर ते निर्माणही करायचे असते. समाजाला नुसते सांगण्याची तपश्चर्या करावी, जिंकण्याचा हट्ट नको. सांगावे, बोलावे आणि सविस्तर लिहावे.’’