बोलीभाषांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 03:24 PM2018-02-26T15:24:55+5:302018-02-26T15:24:55+5:30
देशातील अनेक बोलीभाषा लुप्त होण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्यातील बोलीभाषांचे संवर्धन व्हावे यासाठी राज्यातील शिक्षकांनी पुढाकार घेतला ....
मुंबई - देशातील अनेक बोलीभाषा लुप्त होण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्यातील बोलीभाषांचे संवर्धन व्हावे यासाठी राज्यातील शिक्षकांनी पुढाकार घेतला असून बोलीभाषांच्या जतनासाठी प्रकल्प हाती घेतला असल्याचे मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी सांगितले.
मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातून निरनिराळ्या बोलीभाषांचा परिचय होण्यासाठी बोर्डाने व बालभारतीने काही निवडक बोलीभाषेतील उतारे अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहेत. त्याअनुषंगाने इतर ही काही बोलीभाषा आहेत. कदाचित काही काळांनी या बोली भाषा लुप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी त्या त्या बोलीभाषेतील म्हणी, उखाणे, पोवाडे, ओव्या, अभंग, लोकगीते, पाळणे, काही महत्त्वाचे निवडक शब्द, स्वागत करण्याच्या पद्धतीचे संकलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाने संघाचे अध्यक्ष वि. ना. लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला असून राज्यातील शिक्षकांना अध्यापक संघाच्या त्रैमासिकातुन आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील विविध भागांतील जिल्ह्यातील विविध शाळांमधून अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या मदतीने याचे संकलन होणार असून त्यासाठी फॉर्म तयार करण्यात आला आहे. यामध्ये बोलीभाषेचे नाव, बोलीभाषेतील म्हणी, उखाणे, ओव्या, पाळणे, लोकगीते, अभंग, पोवाडे, बोलीभाषेतील नेहमीच्या व्यवहारातील ५० शब्द, उतारे, बोलीभाषेतील शेती विषयातील शब्द, शालेय जीवनाशी निगडित शब्द, सणांची, अन्नपदार्थांची नावे या मुद्यांवर शिक्षक आपल्या परिसरातून माहिती संकलित करणार आहेत. यावर एक पुस्तिका बनविली जाणार असून शिक्षक संघाच्या जून व सप्टेंबर च्या अंकातून प्रसिद्धीही दिली जाणार असल्याचे मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी सांगितले