अमेरिकेत पुन्हा रंगणार मराठी नाट्यमहोत्सव
By admin | Published: May 10, 2014 11:25 AM2014-05-10T11:25:20+5:302014-05-10T11:25:32+5:30
मराठी नाट्य परिषद आणि अनेक दिग्गज रंगकर्मी एकत्र येऊन मराठी नाटकांचा झेंडा सातासमुद्रापार फडकवण्यास सज्ज झाले असून अमेरिकेत पुन्हा एकदा मराठी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Next
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १० - मराठी नाट्य परिषद आणि अनेक दिग्गज रंगकर्मी एकत्र येऊन मराठी नाटकांचा झेंडा सातासमुद्रापार फडकवण्यास सज्ज झाले असून अमेरिकेत पुन्हा एकदा मराठी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी व कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या पुढाकाराने संपूर्ण दशकभरानंतर पुन्हा एकदा हा नाट्यमहोत्सव रंगणार असून अजित भुरे, प्रदीप वैद्य आणि राजन ताम्हाणे यांचीही त्याला साथ लाभणार आहे. यापूर्वी १९९८ साली सुधीर भट व गोपाळ अलगेरी ह्या जोडीने सुयोग संस्थेच्या चार नाटकांचा नाट्यमहोत्सव ही कल्पना अमेरिकेत नेली. तिथे अत्यंत लोकप्रिय ठरलेला हा महोत्सव २००४ सालानंतर काही कारणांमुळे होऊ शकला नाही. मात्र आता हा नाट्यमहोत्सव पुन्हा सुरू होणार असल्याने नाट्य रसिकांना चांगल्या नाटकांचा पुन्हा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.
२४ मे ते १५ जून या कालावाधीत होणा-या नाट्य महोत्सवात 'काटकोन त्रिकोण', 'मी रेवती देशपांडे' 'भय इथले संपत नाही' आणि 'प्राईस टॅग' अशी एकाहून एक सरस नाटके पाहण्याचा योग येणार आहे. हा नाट्यमहोत्सव अमेरिकेत न्यू जर्सी, बॉस्टन, डेट्रॉईट, शइकागो, लॉस एंजिलिस, सिअॅटल, रॅले अशा प्रमुख शहरांमधील महाराष्ट्र मंडळांतर्फे संपन्न होणार आहे.