मराठीजण ते मुख्यमंत्री सर्वच ‘मराठीचे मारेकरी’

By admin | Published: February 5, 2017 04:29 PM2017-02-05T16:29:06+5:302017-02-05T16:29:06+5:30

मराठीच्या स्वरक्षणार्थ गळा काढणारी जी मंडळी आज आपल्या सभोवताल दिसतात त्यांना खरं तर मराठीशी काही घेणे-देणे नाही.

Marathi people, they are all Marathi's killers | मराठीजण ते मुख्यमंत्री सर्वच ‘मराठीचे मारेकरी’

मराठीजण ते मुख्यमंत्री सर्वच ‘मराठीचे मारेकरी’

Next
>शफी पठाण / ऑनलाइन लोकमत
पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली, दि. 5 - मराठीच्या स्वरक्षणार्थ गळा काढणारी जी मंडळी आज आपल्या सभोवताल दिसतात त्यांना खरं तर मराठीशी काही घेणे-देणे नाही. प्रत्येक जण मराठीला आपल्या स्वार्थासाठी आपल्या सोयीनुसार भांडवल करीत असतो. यात सर्वसामान्य मराठी जणांपासून तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. त्यामुळे हे सगळेच मराठीचे मारेकरी आहेत, असा संतप्त सूर रविवारी संमेलनात आयोजित ‘आम्हीच मराठीचे मारेकरी’ या परिसंवादात व्यक्त झाला. आनंद मिणसे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, डॉ. अमृता इंदुरकर, प्रा. कृष्णा कुळकर्णी, डॉ. दीपक पवार, डॉ. कमलाकर कांबळे, अ‍ॅड. शांताराम दातार या वक्त्यांनी जागतिकीकरणाच्या झंझावातात मराठी कुठे असेल यावर गंभीर व अतिशय अभ्यासपूर्ण मते मांडली. परिसंवादाची सुरुवात करताना  डॉ. दीपक पवार म्हणाले, आज जी मराठीची अवस्था आहे त्यावरून असे वाटते की २० वर्षानंतर कुणीही संमेलनात मराठी कविता ऐकायला येणार नाही. याला कारणीभूत खºया अर्थाने राजकारणी आहेत. त्यांनी साखर कारखान्यांप्रमाणे इंग्रजी शाळा लाटल्या आणि आता बक्कळ पैसा कमवित आहेत. नवीन पिढी मराठी शिकणार कशी? राज्यातील सर्वच वाचनालये अंतिम घटका मोजत आहेत. दस्तुरखुद्द शरद पवार ज्या मुंबई मराठी ग्रंथालयाचे नेतृत्व करताहेत त्या वाचनालयाच्या स्थितीही अतिशय गंभीर आहे. मंत्रालयातील मराठी भाषा भवनाचा प्रश्न ५७ वर्षांपासून होता तसाच कायम आहे. राजकीय नेत्यांची इच्छाशक्तीच नाही. तेच खरे मराठीचे मारेकरी आहेत, असा थेट आरोप डॉ. दीपक पवार यांनी केला. डॉ.कमलाकर कांबळे म्हणाले, आजच्या मराठीच्या विद्यार्थ्याला समग्र तुकाराम वाचला का असे विचारले तर तो म्हणतो, समग्र वाचून काय उपयोग. परीक्षेत तुकारामांवरचा प्रश्नच मुळात पाच गुणांचा असतो. ही आजच्या शिक्षण व्यवस्थेची अवस्था आहे व ती ज्यांच्यामुळे निर्माण झाली आहे तेच मराठीचे खरे मारेकरी आहेत. डॉ. अमृता इंदुरकरांनी भाषेच्या भेसळीवर कडाडून टीका केली. आजच्या तरुणाईची भाषा बदलली आहे. मला अर्जंटमध्ये यावे लागले, मी तुझा किती वेळ वेट करीत होते, अशी ना थड मराठी आणि ना थड इंग्रजी बोलली जात आहे. मराठीच्या हितासाठी काय करायला हवे, हे या तरुणाईला कळत नाही असे नाही. परंतु मुळात इंग्रजी भाषा ही स्टेटस् सिंबांल झाल्याने मराठी आज अडगळीत पडलीय, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रा. कृष्णा कुळकर्णी यांनीही या विषयावरून शासनाला आरोपीच्या पिंजºयात उभे केले. मराठीच्या प्रचार व प्रसाराची जबाबदारी ज्या शासनाच्या खांद्यावर आहे त्या शासकीय यंत्रणेत तरी किती मराठीचा वापर होतो, हा खरा प्रश्न आहे. हेच शासन ज्या शिक्षण व्यवस्थेला संचलित करते ती व्यवस्था विद्यार्थ्यांना संस्कृत विषयाला घ्यायला सांगते. का तर, या विषयातून गुणाची टक्केवारी वाढवता येतात, असे जर शिक्षकच सांगत असतील तर त्या विद्यार्थ्याने भाषेबद्दल काय आदर्श घ्यावे? उगाच भाषेचे वर्गीकरण करू नका. ती ब्राम्हणांची, ही अब्राम्हणांची असा भेद करू नका. बोलीभाषेतील शब्द प्रमाण मराठीत येऊ द्या. असे झाले तर ग्रामीण भाषेचा पोत आणखी समृद्ध होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 
 
संमेलनाध्यक्ष वर्षभरात काय करतात?
 
आज अनेक महानगर पालिकांचे फलक इंग्रजीत आहेत. शासन एक आदेश पारित करून ते मराठीतच लावावे, असा नियम करीत नाही. मुळातच राजकीय पक्षांना मराठीचा कळवळा नाही. निवडणूक आली की ते हा विषय पद्धतशीरपणे कॅश करतात. शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही तेच केले आहे. दुसरे म्हणजे, संमेलनाचे अध्यक्ष संमेलनाच्या मांडवात मराठीवर जोरदार भाषण देतात. परंतु संमेलन संपल्यावर ते मराठीसाठी काय करणार, हे का सांगत नाही असा सवाल अ‍ॅड. शांताराम दातार यांनी उपस्थित केला. वर्तमान अध्यक्षांनीही आपल्या भाषणात याबाबत काहीच सांगितले नाही, यावरही त्यांनी खंत व्यक्त केली. 

आम्हाला आसाराम का पुज्यनिय वाटतो?
 
अपल्या अभंग-कीर्तनातून मराठीला समृद्ध करणारे शेकडो संत महाराष्ट्रात होऊनही आम्हाला आसारामसारखा आरोपी महाराज का महत्त्वाचा वाटतो, यावर चिंतन झाले तर मराठीचे आजचे मारेकरी कोण हे स्पष्ट होईल, अशा प्रखर शब्दात ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी आपले विचार मांडले. इतक्या गंभीर विषयावरचा परिसंवाद संमेलनाच्या मुख्य मंडपात होत नाही, यावरून मराठीप्रती कोण, किती गंभीर आहे ते स्पष्ट होते. गणपती दूध पितो हे आम्ही इंटरनेटवरून दाखवतो, हा विज्ञानाचा दुरुपयोग आहे. वारकºयांची मुलाखत घेणारा टीव्हीचा अँकर मुक्ताबाई आकाशातून आली असे जर सांगत असेल तर लोकांना विज्ञानाचे महत्त्व कळणार तरी कसे? पण, अशा विपरित परिस्थितही घाबरण्याचे कारण नाही. कारण, जोपर्यंत मराठी बोलणारा शेवटचा माणून जिवंत असेल तोपर्यंत मराठीला मरण नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
 
 
चौकट-------३
 
बेळगावकर मराठीचे खरे संरक्षक
 
महाराष्ट्रात मराठीच्या अस्तित्वाला घेऊन असे परिसंवाद आयोजित करण्याची वेळ आलेली असताना सीमाभागातील बेळगावसह सर्व गावे मराठीच्या संवर्धनासाठी अविरत संघर्ष करीत आहेत. या भागातील २५ लाख माणसे राज्य घटनेने त्यांना दिलेले भाषिक अधिकार मिळावे यासाठी लढा उभारत आहेत, अशी माहिती  या परिसंवादाचे अध्यक्ष आनंद मिणसे यांनी दिली. ते पुढे म्हणाले, साहित्याच्या बाबतीत विचाराल तर या भागात दरवर्षी सुमारे २५ विविध साहित्य संमेलने होतात, त्यातील प्रत्येक संमेलनात २५ हजार लोकांची गर्दी असते. आणि भाषेच्या संवर्धनसाठी अशी संमेलने आयोजित करताना त्यांना कुठलेही शासकीय अनुदान मिळत नाही. या समर्पित वृत्तीने प्रत्येक मराठी व्यक्ती भाषेच्या स्वरक्षणार्थ पुढे आला तर या भाषेच्या मारेकºयांना आपले शस्त्र म्यान करावे लागतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: Marathi people, they are all Marathi's killers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.