मराठी फलकाला कन्नड समाजकंटकांनी फासले काळे : अनगोळ येथे तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 07:26 PM2020-11-20T19:26:53+5:302020-11-20T19:33:02+5:30
karnataka, belgaon, kolhapurnews मराठा विकास प्राधिकरण स्थापनेबद्दल मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे अभिनंदन करण्यासाठी लावलेल्या मराठी भाषेतील फलकाला दोघा कन्नड समाजकंटकांनी काळे फासल्याचा निंद्य प्रकार शुक्रवारी सायंकाळी अनगोळ येथे घडला.
बेळगाव -मराठा विकास प्राधिकरण स्थापनेबद्दल मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे अभिनंदन करण्यासाठी लावलेल्या मराठी भाषेतील फलकाला दोघा कन्नड समाजकंटकांनी काळे फासल्याचा निंद्य प्रकार शुक्रवारी सायंकाळी अनगोळ येथे घडला.
या अभिनंदनपर फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आणि बेळगाव दक्षिणच्या आमदारांसह मराठी समाजाच्या कांही कार्यकर्त्यांची छायाचित्र छापण्यात आली होती. या फलकाला मराठी द्वेष्ट्या कन्नडिगांनी आज सायंकाळी काळे फासल्यानंतर अनगोळ परिसरात संतापाची लाट उसळून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गळ्यात लाल -पिवळ्या रंगाचा स्कार्फ घातलेल्या दोन तरूणाने फलकाला काळे फासण्याचे कृत्य केले असून त्याचे व्हिडिओ चित्रण सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. सदर घटना अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडली असून ती घडत असताना कोणीच आक्षेप घेतला नसल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे फलकाला काळे पासून ते तरुण आरामात बिनबोभाट निघून गेले. सदर घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून तो फलक तातडीने तिथून हटविण्यात आला आहे.
कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा गेल्या 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. याला राज्यातील कन्नड संघटनांनी विरोध दर्शवून
5 डिसेंबर रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे. मराठा विकास प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर कन्नड संघटनांची धुसफूस सुरूच होती. या संघटनांच्या दबावामुळे राज्य सरकारने प्राधिकरणाचा निर्णय मागे घेऊन मराठा समाज महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मात्र तरीदेखील कन्नड संघटनांचा विरोध कायम आहे.