Marathi Politics: मराठीच्या पोटदुखीवर इलाज करावा लागेल, उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 09:53 AM2022-04-04T09:53:38+5:302022-04-04T09:54:04+5:30
Uddhav Thackeray: महाराष्ट्रात मराठी शिकली पाहिजे, दुकानांच्या पाट्या मराठीत असल्याच पाहिजेत; पण, जेेव्हा आपण असा आग्रह धरतो, तेव्हा काहींच्या पोटात दुखते, त्यांच्या पोटदुखीचा उपचार करावाच लागेल.
मुंबई : महाराष्ट्रात मराठी शिकली पाहिजे, दुकानांच्या पाट्या मराठीत असल्याच पाहिजेत; पण, जेेव्हा आपण असा आग्रह धरतो, तेव्हा काहींच्या पोटात दुखते, त्यांच्या पोटदुखीचा उपचार करावाच लागेल. राज्याच्या राजधानीत मराठी भाषेचा ठसा पुसण्याचे काम कुणी केले, तर त्याला धडा शिकविण्याची ताकद मराठी भाषेत आहेत. हे अत्याचार कदापि सहन केले जाणार नाहीत. कोणीही यावे आणि उरावर नाचावे हे चालणार नाही, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकताच मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्राचे भूमिपूजन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मातृभाषेच्या मंदिराचे भूमिपूजन करीत आहोत. त्याची सुरुवात करीत आहोत, त्याबद्दल आनंद आहे. काही जबाबदाऱ्या पार पाडताना आयुष्याचे सार्थक झाल्याचे वाटते. मुंबईसाठी माझे आजोबा लढले. त्यानंतर शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचे काम केले. आज मुख्यमंत्री म्हणून माझे नाव या इमारतीच्या भूमिपूजनाच्या पाटीवर लागले, यापेक्षा माझ्या जीवनाचे दुसरे सार्थक असूच शकत नाही.
मंत्री, जागा आणि मुख्यमंत्र्यांना अनुभव
- बऱ्याचदा एखाद्या विभागाची जागा प्रकल्पासाठी हवी असेल, तर त्या विभागाच्या मंत्र्याला वाटते की आपल्याच जवळची जागा द्यायची आहे. तो आखडूनच बसतो. काही ना काही कारणे काढतो.
- अरे बाबा, जोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे विभाग दिलाय, तोपर्यंत तो विभाग आहे. उद्या तो काढून घेतला तर दुसऱ्याकडे जाईल. तरी हा एक मनुष्यस्वभाव आहे.
- तीस वर्षांच्या राजकीय जीवनात त्याचा अनुभव अनेकदा आला आहे. मुख्यमंत्र्यांनाही अडीच वर्षांत त्याचा अनुभव आला आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी टोलेबाजी केली.