मराठी पत्रकार परिषदेचे पुरस्कार जाहीर
By admin | Published: May 19, 2017 01:09 AM2017-05-19T01:09:58+5:302017-05-19T01:09:58+5:30
मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ संपादक, विचारवंत मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांना जाहीर झाला आहे
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ संपादक, विचारवंत मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठेच्या ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कारासाठी ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक गजानन जानभोर यांची निवड करण्यात आली
आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात नागपूर येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
यासोबतच परिषदेच्या अन्य पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली असून आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर यांना
जाहीर झाला आहे, तर आचार्य
अत्रे पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांना सन्मानित केले जाणार आहे.
महिला पत्रकारांसाठी असलेल्या सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी
रश्मी पुराणिक यांची निवड करण्यात आली आहे. कोकणातील पत्रकारांसाठी असलेला
उद्योगपती रावसाहेब गोगटे पुरस्कार यंदा सिंधुदुर्गमधील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत सामंत यांना दिला जाणार आहे. मराठवाड्यातील पत्रकारांसाठीचा नागोजीराव दुधगावकर स्मृती पुरस्कार बीड
येथील ज्येष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर यांना जाहीर करण्यात आला आहे. दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कारासाठी युवा संपादक
राजन वेलकर यांची निवड करण्यात आली असून भगवंतराव इंगळे पुरस्कार धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार गो.
पी. लांडगे यांना जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील तरुण पत्रकारांसाठी यंदापासून सुरू करण्यात आलेला स्व. शशिकांत सांडभोर पुरस्कार पत्रकार विनोद जगदाळे
यांना घोषित करण्यात आला आहे. पत्रकार प्रमोद भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा शोधपत्रकारिता पुरस्कार पत्रकार कार्तिक लोखंडे यांना दिला जाणार आहे. पत्रकारांसाठीचे विविध उपक्रम राबवून राज्यात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या पुणे जिल्हा पत्रकार संघाला यंदाचा पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य उत्कृष्ट जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार दिला जाणार आहे.
रोख रक्कम, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या सर्व पुरस्कारांचे स्वरूप
आहे, अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी दिली.