वाहन परवान्यांसाठी मराठीचे वाचन
By Admin | Published: February 22, 2016 02:19 AM2016-02-22T02:19:35+5:302016-02-22T02:19:35+5:30
वाहन परवान्यांसाठी यापुढे मराठी भाषेचे ज्ञान असणे महत्वाचे असल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार आॅटोरिक्षा परवान्यांच्या यशस्वी अर्जदारांची मराठी
मुंबई : वाहन परवान्यांसाठी यापुढे मराठी भाषेचे ज्ञान असणे महत्वाचे असल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार आॅटोरिक्षा परवान्यांच्या यशस्वी अर्जदारांची मराठी भाषेच्या ज्ञानाची परीक्षा परिवहन विभागाकडून घेण्यात येणार आहे. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र व पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नागपूर, नाशिक व औरंगाबाद महापालिका क्षेत्रात १२ जानेवारी रोजी ४२ हजार ७९८ आॅटोरिक्षा परवान्यांचे लॉटरी पध्दतीने वाटप करण्यात आले होते. लॉटरी वाटपानंतर मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम २४ अन्वये शासनाने घालून देण्यात आलेल्या अटीप्रमाणे अर्जदारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असल्याची माहीती देण्यात आली होती. त्यानुसार २९ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत उमेदवारांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची चाचणी घेण्यात येईल, असे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. या चाचणीसाठी उमेदवाराला मराठी पुस्तकातील एका परिच्छेदाचे वाचन आवश्यक आहे. चाचणीचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार असून यशस्वी उमेदवारांना त्याचदिवशी इरादापत्राचे वाटप केले जाईल. (प्रतिनिधी)
या सर्व कागदपत्रांची मूळ तसेच साक्षांकित प्रत सोबत घेऊन यावी लागणार आहे. या सर्व माहीतीसाठी स्थानिक परिवहन कार्यालयांशी २४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंत संपर्क साधण्यास परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
उमेदवारांनी चाचणीसाठी येताना...
- मूळ लायसन्स
- ओळखपत्र (बॅज)
- निवासाचा वैध पुरावा (विद्युत देयक)
- मागील एक वर्षामध्ये कोणताही गुन्हा दाखल नसल्याबाबत पोलिस विभागाचा दाखला.
- अर्जदार शासनाच्या, निमशासकीय, खाजगी कंपनीमध्ये कायमस्वरुपी नोकरी नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र.
- रहिवासी दाखला.
- अर्जदाराचे नावे इतर कारणाने रद्द झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र.