फेब्रुवारीत अमळनेरमध्ये होणार साहित्य संमेलन, संमेलनाध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 09:26 AM2023-06-26T09:26:56+5:302023-06-26T09:27:03+5:30
Maharashtra: ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची एकमताने निवड करण्यात आली.
पुणे - ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची एकमताने निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक रविवारी झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.
तांबे म्हणाल्या, 'संमेलनाच्या सुरुवातीला २ फेब्रुवारी रोजी बाल मेळावा होईल. त्यानंतर सकाळी ग्रंथदिंडी निघून पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. सकाळी ११ वाजता संमेलनाचे उद्घाटन करण्यात येईल. मुलांचा निवडक कार्यक्रम ४ ते ५:३० या दरम्यान घेण्यात येईल. तसेच निमंत्रितांचे कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, खान्देशी बाणा आदी कार्यक्रम नियोजित आहेत. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता मुलाखतीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दोन परिसंवाद होतील. कथाकथन आणि जुन्या पुस्तकांवर परिचर्चा होईल. खास खान्देश साहित्य वैभव उलगडणारा कार्यक्रम असणार आहे. त्यानंतर जुन्या कवींच्या कवितांचे सादरीकरण व रसग्रहण आजच्या पिढीचे कवी करतील. ४ फेब्रुवारी रोजी प्रथम परिसंवाद होईल. त्यानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा का मिळत नाही? यावर चर्चा होईल. त्यानंतर २ ते ३:३० ज्या साहित्यिकांची जन्मशताब्दी असेल, त्यांच्या स्मरणाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी समारोप होईल.
परमपूज्य साने गुरुजीच्या विचारांची कास धरणारे साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांची साने गुरुजींच्या कर्मभूमीत होणाऱ्या ९७ व्या अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ही अमळनेरकरांच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे.
- डॉ. अविनाश जोशी
(अध्यक्ष, मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर)