मराठी शाळांना ‘अच्छे दिन’!
By admin | Published: October 3, 2016 05:10 AM2016-10-03T05:10:44+5:302016-10-03T05:10:44+5:30
गेल्या काही वर्षांपासून मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यम शाळांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत होती
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यम शाळांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत होती. मात्र गेल्या शैक्षणिक वर्षात मराठी माध्यम शाळांत इंग्रजी माध्यमातून प्रवेश बदल केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या शैक्षणिक वर्षात एकूण १४ हजार ६४७ विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात प्रवेश बदल केला आहे. मराठी आणि शासकीय शाळांबाबत सुरू असलेल्या जनजागृतीचा परिणाम म्हणून मराठी शाळांकडे पालकांचा ओढा वळू लागला आहे. मराठी व जिल्हा परिषदांच्या शाळांमध्येही गुणवत्ता दिसून आल्याने हजारो पालकांनी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत घालायला सुरूवात केली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आहे. शासकीय मदतीअभावी अनेक शाळांची गुणवत्ता सुधारण्याचे काम शिक्षक करत आहेत. शैक्षणिक गुणवत्तेसाठीचे कार्यक्रमही यशस्वी ठरत आहेत. राज्याच्या शैक्षणिक प्रगतीसह शिक्षकांच्या हितासाठी ही मोठी बाब ठरेल, असे मत शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
>ही तर सुरुवात...
गेल्या दोन वर्षांत शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या अनेक उपक्रमांचे हे यश आहे. त्यामुळेच इंग्रजी माध्यम शाळांतील मुले जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल होत आहेत. भविष्यात हे प्रमाण अधिक वाढेल, अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.
>पुणे जिल्हा आघाडीवर
इंग्रजीतून मराठी शाळांत प्रवेश बदल करण्यात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. एकट्या पुणे जिल्ह्णातील एकूण ३ हजार ७७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश बदल केला आहे.
त्याखालोखाल औरंगाबाद जिल्ह्यात २ हजार ०८०, अहमदनगर जिल्ह्यातील १ हजार ९८०, बुलढाणा जिल्ह्यात ८७९, नागपूर जिल्ह्यात ६९० आणि वर्धा जिल्ह्यातील ५४९ विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून मराठी शाळांत प्रवेश घेतला आहे.