मराठी साहित्य संमेलनाचा सोशल मीडियावर 'फ्लॉप शो'
By admin | Published: January 19, 2017 02:05 PM2017-01-19T14:05:35+5:302017-01-19T14:09:14+5:30
तरूणांना आकर्षित करण्यासाठी हुकुमी अस्त्र असलेल्या सोशल मीडियाचा वापर योग्य रितीने करण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक अपयशी ठरले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. १९ - सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत भरणा-या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अवघे दोन आठवडे उरले आहेत. ३ ते ५ फेब्रुवारी रोजी होणा-या या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी आगरी युथ फोरमने खांद्यावर घेतली आहे. संमेलनासाठी अवघे काहीच दिवस उरलेले असून जोरदार तयारी सुरू आहे. साहित्य संस्कृतीचे भूषण असणाऱ्या डोंबिवलीला पहिल्यांदाच संमेलनाचे आयोजन करण्याचा मान मिळाल्यामुळे आबाल-वृद्ध डोंबिवलीकर संमेलनासाठी खूप उत्सुक आहेत.
या निमित्ताने अधिकाधिक तरूण वर्गाला संमेलनाकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने आयोजकांनी साहित्य संमेलनाच्या वेबसाईटसोबतच फेसबूक, ट्विटर आदी सोशल मीडिया माध्यमांवर अकाऊंट उघडले आहे. मात्र या अकाऊंट्सच्या माध्यमातून फारशी काही माहिती मिळत नाही. खरंतर फेसबूक, ट्विटरचा प्रभावी वापर करत क्रिएटिव्ह पोस्ट्स आणि माहिती देऊन तरूण वर्गाला खिळवून ठेवण्याची आणि युझर एगेंजमेंट वाढवण्याची संधी आयोजकांकडे होती. मात्र वेबसाईट असो किंवा फेसबूक, ट्विटर अकाऊंट्स, पेपरमध्ये संमेलनाविषयी आलेल्या बातम्यांची कात्रणे, काही नामवंत कवींच्या कविता आणि निमंत्रण पत्रिका याशिवाय कोणत्याही लक्षवेधी, आकर्षक पोस्ट्स त्यावर टाकलेल्या दिसत नाहीत.
यामुळेच की काय तरूणांनीही संमेलनाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे. साहित्य संमेलनाच्या वेबसाईटवर अनेक सेक्शन्स बनवण्यात आली असली तरीही होमपेजवर प्रामुख्याने संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे यांच्याविषयी तसेच संमेलन आणि डोंबिवलीविषयी त्रोटक शब्दांत माहिती लिहीलेली दिसते. ठळक काही या सेक्शनमध्ये तर विविध वर्तमानपत्रातील बातम्यांचीच कात्रणे आणि लिंक्स दिल्या आहेत.
एक फोटो हा हजार शब्दांपलीकडे बोलून जातो असं म्हणतात. हे लक्षात ठेऊनच की काय साहित्य संमेलनाच्या वेबसाईटवरही फोटे गॅलरीला वेगळे स्थान देण्यात आले आहे. मात्र त्यावर क्लिक केल्यास गेल्या काही वर्षात साहित्य संमेलन कुठे-कुठे पार पडले आदी बाबींचीच त्रोटक माहिती मिळते.
साहित्य संमेलनाचे ट्विटर अकाऊंट नोव्हेंबर महिन्यात उघडले असून या अकाऊंटला अवघ्या नऊ जणांनी फॉलो केले आहे. विशेष म्हणजे साहित्य संमेलनाच्या अकाऊंटवरून नामवंत लेखक वा इतर कोणालाही फॉलो करण्यात आलेले नाही या अकाऊंटवर आत्तापर्यंत १४८ ट्विट्स करण्यात आली असून त्यामध्येही बहुतांश बातम्यांची कात्रणे आणि फेसबूकवरील पोस्ट्सच्या लिंक्स देण्यात आल्या आहेत.
फेसबूक पेजची अवस्थाही काही वेगळी नाही. हे पेज एकूण ४३६ जणांनी लाईक केले आहे. यू-ट्युब अकाऊंटवरही अवघे ४ व्हिडीओज असून ते सर्व आगरी महोत्सवाबद्दल आहेत.
साहित्य संमलेनाच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य
दरम्यान हे ९० वे साहित्य संमेलन ज्या सावळाराम क्रीडा संकुलामध्ये पार पडणार आहे ते संकुलाची दुरावस्था झाली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. संमेलन अवघ्या २ आठवड्यांवर आलेले असतानाही संकुल सुसज्ज झाले नसून पालिकेचेही संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. यासंदर्भातील फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले असून संताप व्यक्त होत आहे. ' प्रिय साहित्यिकांनो, आपण समाज स्वच्छ करण्यासाठी डोंबिवलीत ज्या ठिकाणावरून भाषण देणार आहात ती जागा एकदा डोळेभरून पाहून घ्या' असे मेसेजसही सर्वत फिरत आहेत.