मराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 06:38 AM2018-09-21T06:38:19+5:302018-09-21T06:38:41+5:30
आठवीच्या पुस्तकात गुजराती भाषेतून मजकूर छापून आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता महाराष्ट्रातील शिक्षकांना ‘वंदे गुजरात’ या गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा ‘विनोदी’ घाट शिक्षण विभागाने घातला आहे.
- संजय पाठक
नाशिक : आठवीच्या पुस्तकात गुजराती भाषेतून मजकूर छापून आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता महाराष्ट्रातील शिक्षकांना ‘वंदे गुजरात’ या गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा ‘विनोदी’ घाट शिक्षण विभागाने घातला आहे.
इयत्ता पहिली आणि आठवीचा अभ्यासक्रम नुकताच बदलण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी संबंधित विषय शिक्षकांना येत्या २४ ते २६ सप्टेंबर रोजी व्हर्च्युअल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने दूरदर्शनच्या मराठी ‘सह्याद्री’ वाहिनीला डावलून ‘वंदे गुजरात’ या वाहिनीची निवड केली आहे. महाराष्टÑात ही वाहिनी दिसत नसल्यामुळे त्यासाठी शाळेत ‘डीश सेटटॉप’ बॉक्स बसवावा; अथवा ज्यांना हे शक्य नाही त्यांनी ‘जिओ टीव्ही’ अॅपमधील वंदे गुजरात वाहिनी बघावी, असे आदेशात म्हटले आहे. ज्या शाळांमध्ये टीव्ही नाही, अशा शिक्षकांना इतर शाळेत जाऊन प्रशिक्षण घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
आता हे प्रशिक्षण गुजराती भाषेतून असेल की कसे, असा प्रश्न शिक्षकांना पडला असून राज्याच्या शिक्षण विभागाला गुजरातीबद्दल एवढा पुळका का, असा सवाल केला जात आहे.