गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 07:06 AM2024-05-07T07:06:59+5:302024-05-07T07:08:00+5:30
Marathi vs Gujarati Issue: घाटकोपर पश्चिम येथील माणिकलाल कम्पाऊंड हा भाग उत्तर -पूर्व मतदारसंघात येतो. येथून महायुतीचे मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडीचे संजय पाटील निवडणूक लढवत आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठी उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज करू नये, अशा धाटणीची जाहिरात सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने निर्माण झालेला वाद ताजा असतानाच आता घाटकोपरमध्ये एका गुजरातीबहुल इमारतीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्रचार पत्रके वाटण्यास मज्जाव करत इमारतीत प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन कार्यकर्त्यांना प्रवेश दिला.
घाटकोपर पश्चिम येथील माणिकलाल कम्पाऊंड हा भाग उत्तर -पूर्व मतदारसंघात येतो. येथून महायुतीचे मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडीचे संजय पाटील निवडणूक लढवत आहेत. रविवारी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या भागात प्रचार करत होते. प्रचार पत्रके वाटण्यासाठी ते या भागातील ‘समर्पण’ इमारतीत गेले. मात्र, तेथे त्यांना प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे सोसायटीचे सदस्य आणि कार्यकर्त्यांत वाद झाला. दोन्ही बाजूने हमरीतुमरी सुरू झाली. कार्यकर्ते इमारतीत प्रवेश करण्यासाठी अडून बसले होते. मात्र त्यांना प्रवेश दिला गेला नव्हता.
सोसायटीच्या सदस्यांचे म्हणणे...
आम्ही भाजपचे पदधिकारी असून आम्ही भाजपलाच मतदान करणार असल्याने तुम्हाला इमारतीत जाता येणार नाही.
कार्यकर्त्यांचे म्हणणे...
आम्ही केवळ पत्रके देण्यासाठी जात आहोत. तुम्ही कोणालाही मतदान करा, तो तुमचा अधिकार आहे. मात्र आम्हाला पत्रके वाटू द्या. मराठीबहुल सोसायट्यांमध्ये अशाप्रकारे जाती-धर्म आणि भाषेच्या मुद्द्यावर कोणाला प्रचार करण्यासाठी इमारतीत प्रवेश करण्यास मज्जाव केल्याचे एकही उदाहरण नाही. परंतु गुजरातीबहुल इमारतीत असे प्रकार वारंवार घडत आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव अनेक सोसायट्यांमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची नोंद केली जाते. कोणाला भेटायचे आहे याची नोंद होते, संबंधित व्यक्ती किंवा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच प्रवेश दिला जातो. सुरक्षेच्या कारणास्तव आम्हालाही अनेक सोसायट्यांमध्ये प्रचारास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे विशिष्ट इमारतीत, विशिष्ट पक्षाच्या उमेदवारांना प्रवेश दिला जात नाही, हा वस्तुस्थितीचा विपर्यास आहे.
- भालचंद्र शिरसाट,
माजी नगरसेवक, भाजप