शासकीय संकेतस्थळांना मराठीचे वावडे!
By admin | Published: February 27, 2017 05:43 AM2017-02-27T05:43:42+5:302017-02-27T11:23:01+5:30
एकीकडे राज्य शासनाकडून मराठीला व्यवहार भाषा बनविण्यासाठी पावले उचलली जात आहेत
मुंबई- एकीकडे राज्य शासनाकडून मराठीला व्यवहार भाषा बनविण्यासाठी पावले उचलली जात आहेत, तर दुसरीकडे मात्र, शासनाच्याच विविध खात्यांमध्ये ‘मायबोली’ विषयीची उदासीनता दिसून आली आहे. शासकीय कार्यालयाच्या कामकाजामधील परिपत्रके, अधिसूचना, पत्रव्यवहार आणि विशेषत: संकेतस्थळांच्या माहितीसाठी मराठीचा वापर करण्याच्या सूचना देऊनही अनेक खाती अद्यापही मजकूर इंग्रजीमध्ये प्रसिद्ध करीत आहेत. त्यामुळे मराठी भाषा विभागाने संबंधित खात्यांना पुन्हा एकदा खडसावत, इंग्रजीचा वापर त्वरित थांबवावा आणि सूचनांची अंमलबजावणी करण्याचे तंबीवजा आदेशच दिले आहेत.
शासन स्तरावर मातृभाषेच्या विकासासाठी सकारात्मक वाटचाल सुरू असताना, विविध खातीच मराठीची अडवणूक करीत आहेत. मराठी ही राजभाषा असल्याने सरकारी कार्यालयात मराठीचा वापर करण्याच्या उद्देशाने, राज्य भाषा विभागाने २९ जानेवारी २०१३ ला परिपत्रक काढले होते. संकेतस्थळे मराठीतून करण्याच्या सूचना देऊनही अनेक विभाग आणि त्यांच्या अखत्यारितील कार्यालयांची संकेतस्थळे व त्यामधील मजकूर इंग्रजीमध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे. ही बाब भाजपा सरकारने सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ या वेबपोर्टल व लेखी तक्रारीच्या माध्यमातून विभागाच्या निदर्शनास आली आहे.
(संगणकावर मराठीला प्राधान्य द्या)
(राज्य मराठी विकास संस्थेला पूर्णवेळ संचालक मिळेना!)
आजही काही मंत्रालयीन विभाग व क्षेत्रीय कार्यालयांची संकेतस्थळे पूर्णत: इंग्रजीमध्येच आहेत. त्यामुळे शासकीय आदेशाद्वारे इंग्रजी संकेतस्थळे असलेल्या संबंधित खात्यांना पुन्हा समज देत, सूचनांची अमंलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
>मराठी शाळा टिकाव्यात
विलेपार्ले येथे आयोजित केलेल्या चर्चासत्र मराठी शाळांचा विषय चर्चेचा ठरला. या चर्चासत्रात विविध मराठी शाळांमधील शिक्षकांनी ‘मराठी बोला’ चळवळीशी संलग्न लोकांनी हजेरी लावली. मराठी भाषा व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली पाहिजे, अशा सूचनाही या वेळी मांडण्यात आल्या.
>इंग्रजीचा वापर
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य पोलीस, वनविकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, पर्यटन विकास महामंडळ आदी ४५हून अधिक शासकीय खात्यांच्या संकेतस्थळावरील माहिती इंग्रजीत देण्यात आली आहे.
>एसटीत ‘इंग्रजी’ला ‘रामराम’
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून एसटी महामंडळाने एसटीत इंग्रजीला ‘रामराम’ करण्याचा निर्णय घेतला आहे. आद्याक्षरे, आकड्यांसाठी मराठीचा वापर करण्याचा निश्चय एसटी महामंडळाने केला असून, त्याबाबतचे परिपत्रकच काढण्यात येणार आहे. सोमवारपासूनच त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली. काही वेळेला कामकाजात इंग्रजीचा वापरही सोपा होतो. तर तंतोतंत मराठीचा वापर केल्यास ते समजण्यासही कठीण होऊन बसते. त्यामुळे कामकाजात तरी इंग्रजीचा वापर टाळताना अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बरीच नाकीनऊ येणार आहेत. यंदाही मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जाणार आहे. हा दिन साजरा करताना एसटी स्थानकातील प्रवाशांना पुस्तकांची भेट देण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. एसटी महामंडळाच्या ५६0 बस स्थानकांवर सकाळी ११ वाजता स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते प्रवाशांना मराठी भाषेतील प्रसिद्ध लेखकांची प्रवास वर्णन असलेली पुस्तकेही भेट दिली जातील.
एसटी महामंडळात जवळपास एक लाखाहून अधिक कर्मचारी वर्ग आहे. यामध्ये अधिकारी, वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर असणाऱ्या नावांच्या पाट्या तसेच चालक, वाहकांच्या गणवेशावर असणाऱ्या बॅचवरील नावाची नोंद ही इंग्रजी आद्याक्षरानुसार होते.
एसटीच्या कामकाजात १00 टक्के मराठीकरणाचा निर्णय परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला आहे. परिवहन मंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष होताच त्यांनी एसटीत मराठीकरणाचा आग्रह धरला होता. परंतु अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून त्याकडे पाठ दाखवण्यात आली. आता यासंदर्भात एक परिपत्रकच काढून सोमवारपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.