मराठी जगभरात पोहोचविणार

By admin | Published: February 28, 2016 02:08 AM2016-02-28T02:08:12+5:302016-02-28T02:08:12+5:30

संचारक्रांतीमुळे अभिव्यक्तीची विविध साधने आपल्याला लाभली आहेत. याचा उपयोग करून मराठी जगभरात पोहोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मत मुख्यमंत्री

Marathi will be spread across the world | मराठी जगभरात पोहोचविणार

मराठी जगभरात पोहोचविणार

Next

मुंबई : संचारक्रांतीमुळे अभिव्यक्तीची विविध साधने आपल्याला लाभली आहेत. याचा उपयोग करून मराठी जगभरात पोहोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ साहित्यिक व कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर सभागृहात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. मराठी राजभाषा दिनानिमित्त ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना स्व. शाहीर साबळे आणि ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया वाड यांना स्व. कविवर्य मंगेश पाडगावकर जीवनगौरव पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ५१ हजार रु. रोख, शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे
मुख्यमंत्री म्हणाले की, मराठीच्या संवर्धनासाठी सर्वोपरी पुढाकार घेतला जाईल. राज्य सरकार युनिकोड कन्सॉर्टियम या संघटनेचे सदस्यत्व प्राप्त करून मराठीला संगणकाद्वारे जगभर पोहोचविणार आहे. ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे.
आज २१व्या शतकाने जी मूल्ये तयार करून दिली, त्यामुळे संचारक्रांती झाली आहे. या संचारक्रांतीमुळे अभिव्यक्तीची विविध दालने खुली झाली आहेत. या दालनांचा वापर करून जोपर्यंत मराठी तरुणांच्या मनामध्ये शिरकाव करत नाही तोपर्यंत मराठीच्या विस्ताराची अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. मुख्यमंत्री म्हणाले की, आपण ज्या ज्ञानाधारित समाजाचा विचार करतो या समाज रचनेत चपखल बसणारी मराठी करायची असेल तर मराठी ही ज्ञानभाषा करावी लागेल. त्यासाठी संचारक्रांतीच्या युगात मराठीचा संचार मराठी मनात करावा लागेल. या कार्यक्रमास मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, कार्यक्रमाचे आयोजक आमदार आशिष शेलार, पराग अळवणी, मनीषा चौधरी, उपमहापौर अलका केळकर, देवदत्त साबळे, अंजली पाडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

सहकार्य करू
मराठीला साहित्याची, संस्कृतीची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. ही परंपरा जोपासण्यासाठी अनेक दिग्गजांनी मोलाचे कार्य केले; आणि त्यांचे कार्य अविरत सुरू राहावे यासाठी राज्य सरकार त्यांना सर्वोपरी सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या वेळी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे म्हणाले की, मराठीच्या संवर्धनासाठी भविष्यात काय करावे यासाठी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येत आहे. मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

Web Title: Marathi will be spread across the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.