मराठी बायकांनी मला प्लेबॅक सिंगर बनवलं - आशा भोसले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 06:21 AM2024-06-30T06:21:31+5:302024-06-30T06:21:34+5:30

प्रख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकाचे शुक्रवारी मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन झाले. 

Marathi women made me a playback singer says Asha Bhosle | मराठी बायकांनी मला प्लेबॅक सिंगर बनवलं - आशा भोसले

मराठी बायकांनी मला प्लेबॅक सिंगर बनवलं - आशा भोसले

आशा भोसले, प्रख्यात पार्श्वगायिका

मित्र आणि मैत्रिणींनो, माझा नमस्कार. हे पुस्तक येईल, अशी मला कल्पनाही नव्हती. प्रसाद महाडकर आणि मंडळींनी हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी कष्ट  घेतले. गौतम राजाध्यक्ष आणि यशवंत देव यांना हे पुस्तक अर्पण केले आहे. यशवंत देव यांना मी गुरुस्थानी मानायचे. गौतम तर माझा मुलगाच होता. तुम्ही येथे माझी जी चित्रं बघता तशी मी दिसत नाही; पण त्याच्या कॅमेऱ्यावर कोणीही व्यक्ती सुंदरच दिसायची. त्याच्यात कला होती. 

विश्वास नेरुरकर यांनी सर्व कलावंतांची पुस्तके तयार केली. त्यांनी पहिलं दीदीचं पुस्तक काढलं. त्यावेळी मला ते म्हणाले होते की, आशाबाई मी तुमचं गाण्याचं पुस्तक काढणार आहे. माझ्या वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी ते प्रकाशित केलं. त्या वेळेला साडेअकरा हजार गाणी मी गायलेले होते. पुढे त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. जगात सर्वाधिक ‘रेकॉर्डेड व्हाइस’ माझा आहे, असे म्हणतात.

रेकॉर्डिस्ट नसते तर तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचला नसता. तेव्हा दोन ट्रॅकवर आमचा आवाज घ्यायचे. आता १०० ट्रॅक झाले आहेत. एका ट्रॅकवर मी जे पहिलं गाणं गायलं त्यावेळचे सर्व तंत्रज्ञ, संगीतकार, गीतकार यांचे मी मनापासून आभार मानते. मैं यहाँ तक कैसे पहुंची? तुम्ही बायकांनी, महाराष्ट्रीय बायकांनी मला प्लेबॅक सिंगर बनवलं. पहिलं गाणं जे खेड्यापाड्यात बायका गातात... जात्यावर ओव्या म्हणावं तसं ते गाणं गायलं. ते होतं- बाळा जो जो रे... बाळा जो जो रे... पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे... बाळा जो जो रे... या गाण्यानंतर मला हिंदी गाणीदेखील मिळाली. कुणाला तरी कळलं की कुणीतरी आशा भोसले नावाची गायिका आहे आणि मराठीमध्ये तिचं गाणं खूप चाललेलं आहे. 

हृदयविषयी (हृदयनाथ मंगेशकर) बोलायचं राहूनच गेलं. हृदयला मी मोठा केलाय. १९५६ मध्ये तो आला. विचारलं, आशाताई तू माझं गाणं गाणार का? मी त्याच्याकडे बघितलं. हाच तो मुलगा, जो मी कडेवर घेऊन फिरत होते. मी त्याला म्हटलं, हो गाईन की. त्यावेळेला असं वाटायचं काहीही गाऊ शकतो आपण. काही वेळेला येतं लोकांच्या डोक्यात. मला नेहमी प्रश्न पडतो संगीतकाराला सुचतं कसं? हृदयनाथला चाली कशा सुचतात? बाळ, मी तुला सांभाळलं म्हणून अशा चाली सुचतात. माझ्या करिअरच्या बाबतीत किती राजकारण झालं, हे मला आता कळू लागलं आहे. कलावंताच्या मनात मशाल जळत असते. ती विझायला नको. मनातल्या कळीला उमलू देऊ नका, कारण ती उमलली तर कोमेजून जाईल. मनातल्या कळीला तरुण ठेवा. म्हातारे झालो असं म्हटलं की कळी कोमेजली.

Web Title: Marathi women made me a playback singer says Asha Bhosle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.