पुलंच्या साहित्य भेसळीवरून वाद सुरूच : कुटुंबियांनी व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 09:46 PM2018-09-07T21:46:52+5:302018-09-07T21:49:34+5:30
काही वाहिन्यांवरुन पुलंच्या साहित्याची भेसळ करुन कार्यक्रम सादर केले जात आहेत,अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पु.ल.देशपांडे यांचे साहित्य दर्जेदार स्वरुपात समाजासमोर यावे, पुलंच्या नावावर चाललेली अंदाधुंदी, साहित्याची बेजबाबदार बेसळ रोखण्यासाठी ‘आयुका’ आणि ‘लोकमान्य सेवा संघ’ यांनी एकत्र यावे, अशा आशयाची इच्छा पुलंचे पुतणे जयंत देशपांडे, भाची डॉ. सुचेता लोकरे आणि भाचे डॉ. दिनेश ठाकूर यांची पत्राद्वारे व्यक्त केली आहे. त्यासाठी रॉयल्टीची रक्कम विभागून घ्यावी, असा पर्यायही सुचवण्यात आला आहे. हीच समाजाला आणि पुलंना जन्मशताब्दीची उत्तम भेट ठरेल,असेही नमूद करण्यात आले आहे. काही वाहिन्यांवरुन पुलंच्या साहित्याची भेसळ करुन कार्यक्रम सादर केले जात आहेत,अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
पुल आणि सुनीताबार्इंनी समाजपयोगी कार्य करण्याच्या हेतूनेच पु.ल.देशपांडे फाऊंडेशनची स्थापना केली होती. १९९९ च्या अखेरीस पु.ल.देशपांडे फाऊंडेशनचे, पुलंच्या पार्ल्यातील ‘लोकमान्य सेवा संघ’ या संस्थेत विलीनीकरण झाल्यावर पुलंच्या काही पुस्तकांची रॉयल्टी लोकमान्य सेवा संघाकडे येऊ लागली. आपल्या पश्चात संपूर्ण साहित्याचे सर्वाधिकार त्यांनी ‘आयुका’ या विज्ञानसंस्थेला दिले होते. लोकमानसातील संभ्रमाचा गैरफायदा घेऊन पुलंचे साहित्य विपरित स्वरुपात समाजापुढे आणणा-यांना पायबंद घालण्यासाठी ‘आयुका’ आणि ‘लोकमान्य सेवा संघ’ यांनी एकत्र आहे, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.
पुलंच्या मृत्यूपत्रानुसार, त्यांची सर्व मालमत्ता त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांच्याकडे हस्तांतरित झाली. सुनीताबार्इंनी आपल्या मृत्यूपत्राद्वारे पुलंची नाटके कोणतीही संहिता आणि त्यातील शब्द न बदलता फक्त प्रयोग सादर करण्याचे हक्क खुले केले. फक्त नाटकांचे प्रयोग करण्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही अथवा कोणालाही रॉयल्टी देण्याची गरज नाही. मात्र, पुलंची नाटके आणि इतरही पुस्तकांचे सुनीताबार्इंकडे असलेले हक्क त्यांनी ‘आयुका’ या विज्ञानसंस्थेकडे हस्तांतरित केले.
पुल आणि सुनीताबाई यांनी १९६५ मध्ये ‘पु.ल.देशपांडे फाऊंडेशन’ची स्थापना केली. पुलंच्या काही पुस्तकांचे कॉपीराईट या फाऊंडेशनकडे काही काळ असल्याचे उल्लेख सापडतात. मात्र, पुलंनी त्यांच्या साहित्यासंदर्भात कोणतेही अधिकार फाऊंडेशनला कायदेशीररित्या दिले होते का, दिले असल्यास नेमके कोणते अधिकार, कोणत्या अटींखाली आणि किती काळासाठी वगैरे दाखवणारी कागदपत्रे उपलब्ध नाहीत. १९९९ च्या अखेरीस पु.ल.देशपांडे फाऊंडेशनचे, पुलंच्या पार्ल्यातील ‘लोकमान्य सेवा संघ’ या संस्थेत विलीनीकरण झाल्यावर पुलंच्या काही पुस्तकांची रॉयल्टी लोकमान्य सेवा संघाकडे येऊ लागली. त्यामुळे विलीनीकरणानंतर पुलंच्या काही साहित्याचे कॉपीराईट आपल्याकडे आले आहेत, असा काही लोकांचा आणि खुद्द लोकमान्य सेवा संघाचा समज झाला. मात्र, असे अधिकार दाखवणारी कोणतीही कागदपत्रे न्यायालयातही देखील दाखल झालेली नाहीत.
उलटपक्षी पुलंच्या पश्चात २००९ पर्यंत म्हणजेच सुनीताबार्इंच्या निधनापर्यंत पुलंच्या साहित्यावरील आधारित कार्यक्रम, चित्रपट, व्हिडिओ इत्यादी अनेक परवानग्या सुनीताबार्इंनी स्वत:च दिलेल्या आढळतात. या संदर्भातील हक्क फाऊंडेशनकडे नसून आपल्याकडेच आहेत, असे निवेदन करणारी त्या काळातील सुनीताबार्इंची पत्रे उपलब्ध आहेत. कॉपीराईटबाबत सदैव जागरुक असणा-या सुनीताबार्इंनी वेळोवेळी तज्ज्ञांचे सल्ले घेतले होते. त्यामुळे पुलंच्या साहित्याच्या स्वामित्वहक्कासंबंधी हे निवेदन देण्यात आले आहे.