मुंबईत आज मॅरेथॉन आणि सनबर्नही

By admin | Published: January 15, 2017 04:54 AM2017-01-15T04:54:18+5:302017-01-15T04:54:18+5:30

रविवारी होत असलेल्या मुंबई मॅरेथॉन व सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनाचा मार्ग त्याच्या पूर्वसंध्येला मोकळा झाला. मॅरेथॉन स्पर्धेसाठी विनापरवाना जाहिरातबाजी केल्याप्रकरणी

Marathon and Sunburn in Mumbai today | मुंबईत आज मॅरेथॉन आणि सनबर्नही

मुंबईत आज मॅरेथॉन आणि सनबर्नही

Next

मुंबई : रविवारी होत असलेल्या मुंबई मॅरेथॉन व सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनाचा मार्ग त्याच्या पूर्वसंध्येला मोकळा झाला. मॅरेथॉन स्पर्धेसाठी विनापरवाना जाहिरातबाजी केल्याप्रकरणी ५ कोटींचे शुल्क भरण्याचे फर्मान काढणाऱ्या महापालिकेने शनिवारी जेमतेम २३ लाख रुपये जमा करून घेत स्पर्धेला हिरवा कंदील दिला. दुसरीकडे सनबर्नला परवानगी नाकारणाऱ्या मुंबई पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आयोजकांनी आवश्यक बाबींची पूर्तता केल्याचे सांगून कार्यक्रमास मंजुरी दिली. मॅरेथॉन व सनबर्नबाबत पालिका प्रशासन व मुंबई पोलिसांनी लोटांगण घालण्यामागे वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाले. त्यामुळेच आयत्यावेळी त्यांना नमती भूमिका घ्यावी लागल्याची चर्चा होती.
‘स्टॅण्डर्ड चार्टर्ड’मार्फत २००४पासून मुंबईत दरवर्षी मॅरेथॉन आयोजन करण्यात येते. मात्र या स्पर्धेसाठी मुंबईत लावण्यात येणाऱ्या फलकांचे-जाहिरातींचे शुल्क चुकवण्यात येत नसल्याने यापूर्वीही अनेकवेळा महापालिका आणि आयोजकांमध्ये वाद झाला आहे. या वेळेस ‘लेजर शो’चेही आयोजन केले आहे. मात्र जाहिरात शुल्क, भू-वापर शुल्क आणि सुरक्षा ठेव जमा करण्यात न आल्याची गंभीर दखल घेत ५ कोटी ४८ लाख ३० हजार ६४३ एवढी रक्कम २४ तासांत भरण्याची नोटीस महापालिकेने पाठवली होती.
दुसरीकडे बंगळुरूपाठोपाठ मुंबई पोलिसांनीही परवानगी नाकारल्यामुळे सनबर्न फेस्टिव्हलच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र रातोरात कागदपत्रांची पूर्तता केल्याने शनिवारी त्यांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे बीकेसीत सनबर्न फेस्टिव्हलमध्ये फ्रेंच डीजे डेव्हिड गेटाचा कॉन्सर्ट होणार आहे.
पुण्यातील फेस्टिव्हलमध्येही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सनबर्नला १ कोटी ४० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कायदेशिर प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे सनबर्नच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारल्याचे पोलीस आयुक्त प्रवक्ते अशोक दुधे यांनी जाहीर केले होते. मात्र एका रात्रीत आयोजकांनी आवश्यक असलेली सर्व माहिती, सुरक्षिततेच्याबाबत सर्व उपाययोजना राबविण्याची हमी, आवश्यक कागपत्रांची पूर्तता केली. त्यामुळे त्यांना परवानगी देण्यात आल्याचे शनिवारी दुधे यांनी सांगितले.

- दोन्ही कार्यक्रमांसाठी आयोजकांनी लाखोंचा खर्च केला आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध यंत्रणा काम करीत आहेत. पालिका व पोलिसांनी परवानगी नाकारल्याने शनिवारी आयोजकांनी उच्च स्तरावरून प्रयत्न केले.
दिल्लीतूनही त्याबाबत फोनाफोनी झाली. त्यामुळे पालिका व पोलिसांना परवानगी देण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्याची चर्चा आहे.
जाहिरातबाजीच्या शुल्काच्या गैरसमजुतीतून महापालिकेने ही नोटीस पाठवली आहे. त्यावर आता चर्चा करण्यासाठी अवधी कमी असल्याने गेल्या वर्षीप्रमाणेच शुल्क स्वीकारण्याची विनंती आयोजकांनी केली.

Web Title: Marathon and Sunburn in Mumbai today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.